

यंदाच्या गणेशोत्सवात लालबाग-परळ होणार ‘तिरूपती’मय! ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा आगमन सोहळा थाटात संपन्न
मुंबई, दि. २९ ऑगस्ट 2026 (GNI): मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासातील मानाचे पान असलेल्या लालबाग-परळ भागातील ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा आगमन सोहळा आज शनिवारी ढोलताशांच्या गजरात, थाटामाटात व ‘चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो’ अशा जयघोषात संपन्न झाला. प्रतिवर्षी प्रमाणे यावेळीही लाखो गणेशभक्त कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.
यंदा मंडळाद्वारे तिरूपती तिरूमला येथील श्री वेंकटेश्वर बालाजीच्या धर्तीवर गणेशमूर्ती सजावट व हैदराबाद स्वर्णमंदिर धर्तीवर मंडप परिसर सजावट करण्यात येत आहे. या मंडळ परिसरास तिरूपतीचा साज लाभणार असून यानिमित्ताने लालबाग-परळ परिसर ‘तिरूपती’मय झालेला पाहायला मिळणार आहे.
स्थापनेचे १०७ वे वर्ष साजरे करत असलेल्या व समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या सुप्रसिद्ध ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ गणपतीचे लालबाग-परळ-चिंचपोकळीच्या ‘गिरणगाव’ पट्ट्यातील ऐतिहासिक महत्व मोठे आहे.
‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ची मूर्ती ही दरवर्षीच गणेशभक्तांच्या आकर्षणाचा विषय असते. यावेळी सभोवतालच्या सजावटीत विष्णुचा अवतार श्री बालाजी देवस्थान येथील संकल्पनेनुसार गरूड, कीर्तिमुख, शंख, चक्र, कर्पूर-युक्त नामम् (टिळा), आदि वैशिष्ट्यांसह चिंतामणी गणपती स्थानापन्न होत आहे. मुळातच अतिशय आकर्षक, देखण्या गणेश मूर्तीला या सर्व आभूषणे व वैशिष्ट्यांचा साज लाभत असल्याने तिचे प्रासादिक सौंदर्य अधिकच उजळून निघणार आहे.
तिरूपती बालाजी मंदिरासह हैदराबाद येथील श्री वेंकटेश्वर मंदिर (स्वर्णगिरी), भुवनगिरी येथील मंदिराच्या स्थापत्य व वास्तुरचनेचीही प्रतिकृती येथे वेगवेगळ्या आकर्षक पद्धतीने उभारण्यात येणार आहे. गोपुरम, दीपस्तंभ, पौराणिक कथांमध्ये असणारे व दाक्षिणात्य मंदिरांमध्ये बहुतांश आढळणारे याली किंवा व्याला (सिंह, हत्ती व घोड्याचे मिश्रण असलेला रक्षक प्राणी) आदी अनेक रचना येथील मंडप व अन्य सजावटीत उभारण्यात येणार असल्याचे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र डिचोलकर यांनी सांगितले.
“अत्यंत कल्पक पद्धतीने विचार करून, उत्तमोत्तम कलाकार, कुशल कारागीर, आधुनिक तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने निर्माण केलेली यंदाच्या गणेशोत्सवातील कलात्मक निर्मिती चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनास येणाऱ्या तमाम गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षणाची व आनंदाची ठरेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.” असे श्री. डिचोलकर यावेळी म्हणाले.
मुंबईच्या ऐतिहासिक गिरणगाव परिसरात १९२० साली स्थापन झालेले हे मंडळ शहराच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. गिरणगावच्या कष्टकरी संस्कृतीचे प्रतीक असलेला चिंतामणी गणपती आजही सामाजिक एकता आणि भक्तीचे प्रतीक आहे. दरवर्षी होणाऱ्या आगमन सोहळ्याला देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहतात.
यावर्षीच्या गणेशोत्सव आयोजनासाठी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळास अदाणी उद्योग समूहाचे विशेष सहकार्य लाभले आहे. गणेशोत्सव आता जेमतेम दोन आठवड्यांवर येऊन ठेपला असून याकरिता मंडळातर्फे जय्यत तयारी अहोरात्र सुरू आहे.ends GNI
Be the first to comment on "यंदाच्या गणेशोत्सवात लालबाग-परळ होणार ‘तिरूपती’मय! ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा आगमन सोहळा थाटात संपन्न"