Mumbai, 23rd June 2022 (GNI): बृहन्मुंबई महानगरपालिकेने काळा घोडा कला महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या काळा घोडा असोसिएशनच्या सहकार्याने व्यावसायिक आणि नवोदित संगीतकार आणि चित्रपट निर्मात्यांसाठी एक अनोखी योजना जाहीर केलीय. जे मुंबईत राहातात, मुंबईत श्वास घेतात आणि मुंबईचा आत्मा जाणून घेतलाय अशा संगीतकार आणि चित्रपट निर्मात्यांनी म्युझिक व्हिडिओ प्रोजेक्टमध्ये भाग घेऊन मुंबईचे चित्रण करावे ज्यायोगे मुंबईचे वेगळे दर्शन प्रेक्षकांना होऊ शकेल अशी ही योजना आहे. “क्रिएटिव्हिटी- पाथ टू इक्वॅलिटी” या थीमवर १० जुलै २०२२ पूर्वी मूळ संगीत ट्रॅक तयार करण्यासाठी संगीतकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. निवडलेले म्यूझिक ट्रॅक १५ दिवसात एक संगीत व्हिडिओ तयार करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांमध्ये शेअर केले जातील. संगीत व्हिडिओ तयार करून सादर करण्याची अंतिम तारीख २९ जुलै २०२२ आहे.
भारतातील चित्रपटाचे केंद्र असलेल्या मुंबईचा द म्युझिक व्हिडिओ प्रोजेक्ट (MVP) हा अनोखा प्रोजेक्ट आहे. संगीतकार आणि चित्रपट निर्मात्यांमधील अद्वितीय सहयोग प्रकल्प आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या प्रकल्पाची संकल्पना आणि नियोजन ४८एचएफपी (48HFP) इंडियाचे आहे.
मुंबईतील तरुणांना आणि सर्जनशील व्यावसायिकांना, विद्यार्थ्यांना संगीत आणि चित्रपट निर्मितीत सहभागी करून घेऊन एमव्हीपी मुंबईची संस्कृती आणि संपन्न वारशाचा प्रचार करणार आहे.
यूनेस्कोच्या समाजातील असमानता कमी करण्याच्या उद्देशाला आणि क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कच्या थीम क्रिएटिव्हिटी, पाथ टू इक्वॅलिटी, कॅप्चरिंग द स्पिरिट ऑफ मुंबई योजनेला एमव्हीपीचे समर्थन आहे. ही योजना यूएन २०३० च्या अजेंडाच्या केंद्रस्थानी आहे. यूनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कची सुरुवात २००४ मध्ये झाली असून यात सध्या २४६ शहरांचा समावेश आहे.
२०१९ मध्ये यूनेस्कोने मुंबईची चित्रपटासाठी क्रिएटिव्ह सिटी म्हणून निवड केली. यासाठी मुंबई महानगरपालिकेने युनेस्कोशी सहकार्य करण्याचे पाऊल उचलले. याअंतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रमांद्वारे, मीडिया आणि चित्रपट समुदायातील तरुण, विद्यार्थी आणि सर्जनशील व्यावसायिकांशी जवळचा संवाद निर्माण करून त्यांनी तयार केलेल्या चित्रपटांद्वारे मुंबईकरांपर्यंत पोहोचण्याची आशा मुंबई मनपाला आहे.
मुंबईच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महत्वाच्या संस्थांपैकी एक असलेली संस्था म्हणजे काळा घोडा असोसिएशन. १९९९ पासून दरवर्षी काळा घोडा कला असोसिएशनतर्फे दक्षिण मुंबईत काळा घोडा कला महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवाला विविध क्षेत्रातील रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. काळा घोडा महोत्सवाचे प्रेक्षक, प्रशंसकांची संख्या कोट्यवधींच्या आसपास आहे. काळा घोडा महोत्सवाची लोकप्रियता पाहून मुंबई मनपाने काळा घोडा असोसिएशनसोबत त्यांच्या या नव्या योजनेसाठी सहकार्य करार केला आहे.
म्युझिक व्हिडिओ प्रोजेक्टची संकल्पना आणि अंमलबजावणी 48 तास फिल्म प्रोजेक्ट इंडियाची आहे. ४८एचएफपी इंडिया (48HFP India) कडे देशभरातील प्रतिभासंपन्न चित्रपट निर्मात्यांची नोंदणी आहे. ही संस्था चित्रपट-आधारित स्पर्धा, ब्रँडेड सामग्री आणि चित्रपट-आधारित कार्यक्रमांमध्ये नवनवीन प्रयोग करीत असते आणि अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्याचा संस्थेला प्रचंड अनुभव आहे.
आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना मुंबईची, मुंबईच्या आवाजाची ओळख करून देण्यासाठी यशस्वी संगीतकार, म्युझिक बँड आणि कलाकारांकडून संगीत तयार करून घेतले जाणार असून यासाठी वोबल क्रिएटिव्ह आणि कंटेंट हे भागीदार आहेत.
म्यूझिक व्हीडियोतील विजेत्यांना मुंबईतील एका भव्य अशा कार्यक्रमात पुरस्काराने सम्मानित केले जाणार असून तेथेच त्यांच्या म्यूझिक व्हीडियोचे प्रसारणही केले जाणार आहे. विशेष म्हणजे निवडलेले व्हिडिओ जुलै २०२२ मध्ये सॅंटोस, ब्राझील येथे आयोजित यूसीसीए च्या कार्यक्रमासह इतर अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येही प्रदर्शित केले जाणार आहेत.
म्युझिक बँड आणि कलाकारांना त्यांच्या गीत, शैली, रचना आणि भावनांद्वारे मुंबईचा आत्मा सादर करायचा आहे, तर चित्रपट निर्मात्यांना ते त्याच पद्धतीने पडद्यावर सादर करायचे आहे. जागतिक मंचावर स्वतःच्या कलेचे प्रदर्शन घडवण्याची ही अनोखी संधी एमव्हीपीने उपलब्ध करून दिलेली आहे.
किक ऑफ डे दिवशी म्हणजेच २९ जुलै रोजी निवडक ट्रॅक घोषित करून नोंदणीकृत चित्रपट निर्मात्यांना गाण्याच्या ट्रॅकचे वाटप केले जाईल. १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत व्हिडीओ शूट करून सादर करावा लागणार आहे. यासाठी कोणतीही एक अट किंवा शैली नसून संगीतकार आणि चित्रपट निर्माते त्यांच्या प्रतिभेला आणि थीमला वाव देणारी शैली यासाठी निवडू शकणार आहे. मुंबईतील गोंगाटही काही जणांना संगीतासारखा भासू शकतो. त्याचाही वापर ट्रॅकसाठी केला जाऊ शकतो आणि मुंबई हे कसे वैविध्यपूर्ण शहर आहे हे दाखवले जाऊ शकते.
मुंबई मनपा, काळा घोडा कला असोसिएशन आणि वोकल क्रिएटिव्ह आणि कंटेंट एकत्रितपणे एमव्हीपी योजना प्रचंड प्रमाणात यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्नरत आहे. मुंबईचे आजवर न झालेले चित्रण गाणे आणि म्यूझिक व्हीडियोतून सादर होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.www.musicvideoproject.in
Be the first to comment on "युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क म्युझिक व्हिडिओ प्रोजेक्टमध्ये सहभागी होऊन मुंबईचा आत्मा संगीतबद्ध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची योजना. काळा घोडा कला महोत्सवासोबत जोडले जाऊन चित्रपट निर्माते आणि संगीतकारांना या योजनेसाठी मनपाने केले आमंत्रित"