Mumbai, 27th April 2022 (GNI): जन्मजात बहिऱ्या असलेल्या कोणत्याही मुलासाठी आवाजाची जादू, श्रवणशक्ती हे जगातील सर्वात मोठे वरदान आहे. मानवी शरीरातील पंचेंद्रियांपैकी एक म्हणजे ऐकू येण्याची शक्ती. संवाद, संभाषण, भावनिक नातेसंबंध आणि शिकणे या सर्व प्रक्रियांमध्ये ऐकण्याची शक्ती अत्यंत आवश्यक असते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने जन्मजात बहिऱ्या असलेल्या १२६ मुलांना श्रवणशक्तीचे वरदान दिले आहे. या रुग्णालयाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या सहयोगाने गेल्या वर्षभरात ही किमया यशस्वीपणे करून दाखवली आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि महाराष्ट्र सरकार यांचा प्रमुख उपक्रम आहे.
कोविडमुळे निर्माण झालेली अनेक आव्हाने समोर असताना देखील हा उपक्रम पीपीपी मॉडेल स्वरूपात राबवला गेला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील मुले व त्यांच्या पालकांसाठी आयुष्यभराचे वरदान ठरला. हा उपक्रम जानेवारी २०२१ मध्ये सुरु झाला, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने तेव्हापासून १२६ मुलांवर या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. ही मुले शाळेत जाऊ लागली आहेत आणि त्यांना आता ऐकू येत असल्यामुळे ती मुले बोलू देखील शकतील, ही बाब मुलांच्या आईवडिलांसाठी अतिशय आनंद व समाधान देणारी ठरली आहे.
राज्य सरकारने या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी आर्थिक साहाय्य दिले असून स्कॅनिंग, इमेजिंग, शस्त्रक्रिया, स्पीच थेरपी आणि रुग्ण व पालक यांच्या राहण्याची सोय ही सर्व जबाबदारी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने उचलली आहे. दोन वर्षांपर्यंतच्या वयाच्या मुलांसाठी विस्तृत ऑरेल रिहॅबिलिटेशन देखील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये केले जाते, तसेच मुलांचे पालक आणि त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना त्याचे प्रशिक्षण दिले जाते.
राज्य सरकारने नियुक्त केलेली विशेषज्ञ व एक सिव्हिल सर्जन यांची टीम जिल्हा पातळीवर शाळा आणि अंगणवाड्यांमार्फत मुलांची निवड करते. प्रत्यारोपणासाठी निवड होण्यापूर्वी ब्रेनस्टेम इव्होक्ड रिस्पॉन्स ऑडिओमेट्री (बीईआरए) करून मुलाची ऐकण्याची क्षमता नेमकी किती आहे ते निश्चित केले जाते व ते मूल पूर्णपणे बहिरे आहे याची खात्री करवून घेतली जाते. खात्री झाल्यानंतर त्या मुलाला तीन महिने एक हियरिंग एड दिले जाते आणि त्याला/तिला प्रत्यारोपणाची गरज आहे अथवा नाही ते तपासले जाते. जर मुलाला प्रत्यारोपणाची गरज आहे हे लक्षात आले तर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलशी संपर्क साधण्यास सांगितले जाते.
या उपक्रमाबाबत कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट आणि हेड, ईएनटी सर्व्हिसेस डॉ. संजीव बधवार यांनी सांगितले, “संपूर्णपणे कर्णबधिर मुलांना श्रवणशक्ती मिळवून देण्याची संधी देणाऱ्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊन आम्हाला खूप आनंद होतो आहे. शाळेत जाण्याच्या वयात आलेल्या मुलांसाठी बहिरेपणा ही खूप गंभीर समस्या ठरते. त्यामुळे इतरांसोबत त्यांच्या संवादांवर आणि त्यांच्या एकंदरीत शिक्षणावर विपरीत परिणाम होतो. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम योजनेच्या सहयोगामुळे आम्ही या मुलांवर वेळ हातातून निघून जाण्याआधी उपचार करू शकलो. कॉक्लियर प्रत्यारोपण कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही त्यांना ऐकण्याचा आनंद देण्याबरोबरीनेच बोलण्याचे, आवाज, शब्द आणि भाषा शिकण्याचे प्रशिक्षण देखील देत आहोत.”
१२६ मुलांपैकी एक आहे प्रज्ञा, अवघी तीन वर्षांची ही मुलगी गडचिरोलीहून आली होती. प्रज्ञा ९ महिन्यांची होती तेव्हा तिच्या पालकांच्या लक्षात आले की ती हातांच्या हालचालींना प्रतिसाद देत होती पण आवाजांना मात्र अजिबात प्रतिसाद देत नव्हती. तपासणीअंती समजले की ती दोन्ही कानांनी ऐकू शकत नव्हती. बाळाला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेण्याचा सल्ला प्रज्ञाच्या पालकांना देण्यात आला. पण त्यावेळी कोविड प्रतिबंधांमुळे ते प्रवास करू शकले नाही. आता दोन वर्षांनी ते मुलीला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. इथे तिच्या एका कानात कॉक्लियर प्रत्यारोपण करण्यात आल्याने प्रज्ञासाठी आवाजाचे नवे जग खुले झाले आहे.
समीर हा पाच वर्षांचा मुलगा गडचिरोलीहून आला आहे. तो कर्णबधीर असल्याचे निदान तो एक वर्षाचा असताना करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना मुलाच्या उपचारांसाठी आर्थिक साहाय्य मिळू शकेल अशा सरकारी योजना नसल्यामुळे समीरचे पालक त्याच्यावर उपचार करू शकले नाही. याआधी या योजनेमध्ये फक्त दोन वर्षे वयापर्यंतच्या मुलांवरच शस्त्रक्रिया होऊ शकत होती. ऑक्टोबर २०२० मध्ये वयाच्या पात्रतेमध्ये सुधारणा करण्यात आली. त्यामुळे या मुलाचे पालक त्याला कॉक्लियर प्रत्यारोपण करण्यासाठी चार वर्षांनंतर घेऊन येऊ शकले. आता समीर ऐकू शकतो!
शस्त्रक्रियेनंतर रिहॅबिलिटेशन प्रक्रिया वर्षभर चालते. यामध्ये प्रत्यारोपण करण्यात आलेल्या यंत्राचे साउंड मॅपिंग देखील केले जाते, दर महिन्याला यंत्राच्या आवाज क्षमतेमध्ये हळूहळू वाढ केली जाते. यामुळे त्या मुलाला आवाजाच्या कंपनांची सवय होते, ते आवाज ओळखू लागतात आणि हळू व सतत होणारे बोलणे ते समजू लागतात. रुग्णांना दर दोन ते तीन महिन्यांनी फॉलो-अप तपासणी करून घ्यावी लागते, त्यासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमार्फत मुले जिथे राहतात तिथून जवळच्या एखाद्या शहरामध्ये तपासणी शिबीर आयोजित केले जाते.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संतोष शेट्टी म्हणाले, “वंचित कुटुंबांमधील मुलांसाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या आरोग्यसेवा उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे हे आम्ही आमचे सुदैव मानतो. भारतामध्ये शाळेत जाण्याच्या वयात असलेल्या कर्णबधीर मुलांची संख्या खूप आहे. पण या समस्येची तपासणी करण्यासाठी विशेष कार्यक्रम नसल्यामुळे त्यापैकी बहुतांश मुलांची समस्या लक्षात येत नाही आणि त्या मुलांवर काहीच उपचार होत नाहीत. गरजू रुग्णांना सर्वसमावेशक उपचार सेवा पुरवणे हा आमच्या सामाजिक उपक्रमांचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणूनच आम्ही राज्य सरकारला या उपक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर साहाय्य करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, ऐकू न येणारी मुले ओळखण्यापासून ते त्या मुलांना जागतिक दर्जाच्या उपचारसेवा पुरवण्यापर्यंत सर्व मदत आम्ही करत आहोत. आमच्या सेवा कोणत्याही एका क्षेत्रापुरत्या मर्यादित राहू नयेत, गरजू व्यक्तींच्या जीवनात शाश्वत, सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचावे हा आमचा उद्देश आहे.”
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या सरकारी उपक्रमामार्फत चालवला जातो. जन्मजात विकार, कमतरता, आजार आणि अपंगत्वासह इतर बाबी ज्यामुळे मुलाचा विकास उशिरा होत आहे या संदर्भात समस्या लवकरात लवकर ओळखून त्यावर लवकरात लवकर उपचार केले जाणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.ends
Be the first to comment on "१२६ कर्णबधिर मुलांना मिळाले श्रवणशक्तीचे वरदान कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या सहयोगाने करण्यात आल्या कॉक्लियर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कॉक्लियर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून गेल्या वर्षभरात १२६ मुलांमधील जन्मजात बहिरेपणा दूर करण्यात आला"