नवी मुंबई, २२ फेब्रुवारी २०२२ (GNI): खारघर नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या ७१ वर्षांच्या श्रीमती इंदुदेवी यांची उजव्या डोळ्याची दृष्टी कॉर्नियल डीकॉम्पेन्सेशनमुळे गेली होती. ३ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेतील चुकीमुळे त्यांच्या डोळ्याची अवस्था बिघडत गेली होती. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील कॉर्निया ट्रान्सप्लांट सर्जरी टीमने अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून श्रीमती इंदुदेवी यांना नवे जीवन मिळवून दिले. या महिलेसाठी दाता मिळवण्यात सहियर मेडिकेयर फाउंडेशन ट्रस्टने मदत केली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या दृष्टीमध्ये सुधारणा झाली असून त्या बऱ्या होत आहेत.
डॉ.अभिषेक होशिंग, कन्सल्टन्ट – ऑपथेल्मोलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी सांगितले, “श्रीमती इंदुदेवी यांना सुडोफेकिक बुलस केराटोपॅथी झाल्याचे निदान करण्यात आले होते. शस्त्रक्रियेमध्ये, खास करून मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये आघात झाल्याने कॉर्नियाचे नुकसान होते जे पुन्हा भरून येऊ शकत नाही. त्या जेव्हा सर्वात पहिल्यांदा आमच्याकडे आल्या तेव्हा त्यांना फक्त अंधुकसा उजेड आणि हलणाऱ्या आकृत्या दिसत होत्या. त्यांना कॉर्निया प्रत्यारोपणाची गरज होती. महाराष्ट्र सरकारच्या कॉर्नियल ट्रान्सप्लांट रेसिपियन्ट यंत्रणेमध्ये आणि ठाण्यातील सहियर आय बँकेमध्ये त्यांची नोंदणी करण्यात आली. त्यामध्ये रुग्णाच्या आवश्यकतेप्रमाणे अनुकूल कॉर्नियल पेशी उपलब्ध होताच इंदुदेवी यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. कॉर्निया प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये नुकसान झालेला संपूर्ण कॉर्निया किंवा त्याचा काही भाग काढून टाकला जातो आणि त्याजागी दात्याकडून प्राप्त झालेल्या निरोगी कॉर्नियल पेशी बसवल्या जातात. कॉर्निया प्रत्यारोपणामुळे दृष्टी परत येऊ शकते, वेदना कमी होतात आणि नुकसान झालेल्या कॉर्नियाची स्थिती सुधारते. श्रीमती इंदुदेवी यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि त्यानंतर त्यांच्या दृष्टीमध्ये सुधारणा झाली. शस्त्रक्रियेनंतर पहिल्या दिवसापासून त्या १ मीटर अंतरावरील बोटे बिनचूक मोजू शकल्या. पेशी जसजशा ठीक होत जातील आणि सूज जसजशी कमी होईल, त्यांची स्थिती हळूहळू सुधारत जाईल.”
श्री. संतोष मराठे, युनिट हेड-सीईओ, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले,”अपोलो जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवासुविधा मिळवण्यात समाजाची मदत करून नवे मापदंड रचत आहे. अपोलो हॉस्पिटल्सच्या कॉर्निया ट्रान्सप्लांट टीममध्ये देशातील काही सर्वोत्तम व अनुभवी प्रत्यारोपण सर्जन्सचा समावेश आहे. याठिकाणी रुग्णांना जगभरात उपलब्ध असलेल्या सर्वोत्कृष्ट उपचार पर्यायांचा व परिणामांचा लाभ घेता येतो. अवयव दान किती सहजपणे आणि वेदनारहित पद्धतीने करता येऊ शकते आणि त्यामुळे अनेकांना नवे जीवन मिळू शकते याबाबत लोकांना जागरूक करणे हा आमचा उद्देश आहे.”ends
Be the first to comment on "‘कॉर्निया प्रत्यारोपणा’ ने ७१ वर्षीय आजीला मिळाली पुन्हा दृष्टी, नवी मुंबई ‘अपोलो’ मध्ये यशस्वीरित्या करण्यात आलेले पहिले कॉर्निया प्रत्यारोपण"