मुंबई, ५ जानेवारी २०२२ (जीएनआई) : द अक्षय पात्र फाउंडेशन (टीएपीएफ) आणि भारतातील संयुक्त राष्ट्र संघाचा वर्ल्ड फूड प्रोग्राम (डब्ल्यूएफपी) यांनी आपापसांत भागीदारी करून प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण (पीएम पोषण) योजनेचा (आधीची मध्यान्ह भोजन योजना) प्रभाव अधिक जास्त वाढवण्यासाठी एकत्र काम करण्याचे ठरवले आहे. या संदर्भात करण्यात आलेल्या करारावर वर्ल्ड फूड प्रोग्रामचे भारतातील प्रतिनिधी व कन्ट्री डायरेक्टर श्री. बिशॉ पराजुली आणि द अक्षय पात्र फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री. चंचलापती दास यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
श्री. बिशॉ पराजुली यांनी सांगितले, “या धोरणात्मक भागीदारीमध्ये सखोल व दीर्घ कार्य आणि अनुभव यांचा मिलाप होत असल्याने त्यामुळे अनेक पट अधिक प्रभाव निर्माण होईल. १९६१ मध्ये सुरुवात झाल्यापासून वर्ल्ड फूड प्रोग्रामने शाळेमध्ये विद्यार्थ्यांना भोजन पुरवणे हे आपले उद्धिष्ट मानले आहे. शाळेमध्ये भोजन पुरवले जाण्याच्या उपक्रमाला पाठिंबा देण्याचा तब्बल सहा दशकांचा अनुभव डब्ल्यूएफपीच्या गाठीशी आहे, राष्ट्रीय पातळीवर शाश्वत स्वरूपाचे शालेय भोजन उपक्रम राबवले जाण्यासाठी १०० पेक्षा जास्त देशांसोबत डब्ल्यूएफपी काम करत आहे.”
द अक्षय पात्र फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री. चंचलापती दास यांनी सांगितले, “खाद्य सुरक्षा मिळवण्याच्या दिशेने आपला देश यशस्वी वाटचाल करत आहे. भारतात शालेय भोजन योजनेमुळे मुलांना खात्रीशीरपणे जेवण मिळू लागले आहे. समाजाच्या तळागाळामध्ये कोणीही भुकेले राहू नये यासाठी काम करण्याच्या आमच्या कौशल्यांच्या साहाय्याने जगभरात मोठ्या प्रमाणावर भोजन योजना राबवणाऱ्या डब्ल्यूएफपीच्या ग्लोबल नेटवर्कला या भागीदारीच्या माध्यमातून अनुकूलता निर्माण करून देणे हा आमचा उद्देश आहे.”
भूक आणि कुपोषण यांच्या निर्मूलनासाठी काम करण्याचा दीर्घ व यशस्वी अनुभव आणि नैपुण्ये यांचे बळ सोबत असलेल्या दोन संस्था या दीर्घकालीन भागीदारीमध्ये एकत्र येत आहेत. डब्ल्यूएफपी आणि अक्षय पात्र फाउंडेशन मिळून एक सुकाणू समिती स्थापन करतील, ज्यामध्ये दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. या भागीदारीअंतर्गत जी कामे करायची आहेत त्यांचे नियोजन, चर्चा आणि कामांचा पडताळा घेण्यासाठी दर तीन महिन्यांनी या समितीची बैठक होईल. या सर्व कामांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक संसाधने या दोन्ही संस्था जमा करतील.
Be the first to comment on "‘अक्षय पात्र – यूएन वर्ल्ड फूड प्रोग्राम’ ची भागीदारी भारतातील शालेय भोजन उपक्रम अधिक प्रभावी करणार"