मुंबई, १५ फेब्रुवारी २०२१ (GNI): अपोलो कॅन्सर सेंटरने बांग्लादेशमधून आलेल्या रुग्णावर ट्यूबलेस व्हीएटीएस हे नवे तंत्र वापरून यशस्वीपणे उपचार केले आहेत. अतिशय कमीत कमी जखमा असलेली ही उपचार प्रक्रिया भारतात पहिल्यांदा वापरली गेली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये मोहम्मद नाहिद हसन यांना डाव्या मांडीच्या हाडामध्ये इविंग्स सरकोमा झाल्याचे निदान बांग्लादेशात करण्यात आले. हा कर्करोगामध्ये होणाऱ्या ट्युमरचा अतिशय दुर्मिळ प्रकार आहे जो हाडांमध्ये किंवा हाडांभोवतीच्या कार्टिलेज किंवा नर्व्ह्ज यासारख्या सॉफ्ट टिश्यूजमध्ये वाढतो. १० ते २० वर्षे वयोगातील व्यक्तींना हा आजार होतो. नाहिदवर बांग्लादेशातील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले, याठिकाणी या ट्युमरसाठी त्याला केमोथेरपीची अनेक सेशन्स घ्यावी लागली. फेब्रुवारी २०२० मध्ये त्याच्या डाव्याच पायाच्या खालच्या भागात फ्रॅक्चर झाले आणि ते दुरुस्त करण्यात आले. त्यानंतर काही काळाने या रुग्णाच्या डाव्या फुफ्फुसाच्या वरील भागात मेटास्टॅटिक लम्पस् (कॅन्सर लम्पस्) निर्माण झाले, त्यावेळी लॉकडाऊन सुरु होता. फुफ्फुसांमधील मेटास्टॅटीक ट्यूमर्स हे कर्करोगाचे रूप असते जे रुग्णाच्या शरीराच्या इतर भागांमध्ये विकसित होतात आणि रक्तामार्फत फुफ्फुसांमध्ये पसरतात. स्तन,आतडे, प्रोस्टेट, सरकोमा, ब्लॅडर या अवयवांना होणारे कर्करोग आणि न्युरोब्लास्टोमामध्ये ट्यूमर्स फुफ्फुसांमध्ये पसरतात. डिसेंबर २०२० मध्ये नाहिदला पुढील तपासणी आणि उपचारांसाठी चेन्नईतील अपोलो कॅन्सर सेंटर येथे आणण्यात आले. त्याच्या डाव्या फुफ्फुसामध्ये वरील भागात कर्करोग बऱ्याच ठिकाणी पसरला असल्याचे आढळून आले. या रुग्णाला त्याच्या तब्येतीतील आधीची गुंतागुंत लक्षात घेता ट्यूबलेस व्हीएटीएस प्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला गेला. त्याच्या शरीरात कोणतीही ट्यूब न घालता फुफ्फुसातील मेटास्टेसिस काढून टाकण्यासाठी कमीत कमी जखमा देणारी सर्जरी करण्यात आली. ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली व रुग्णाला दुसऱ्या दिवशी घरी पाठवण्यात आले.
अपोलो कॅन्सर सेंटर येथील कन्सल्टन्ट थोरॅसिस ऑन्कोलॉजिस्ट डॉ.अभिजीत दास यांनी सांगितले, “पारंपरिक प्रक्रियेच्या तुलनेत ट्यूबलेस व्हीएटीएस तंत्राचे अनेक लाभ आहेत. यामध्ये जखमा कमीत कमी असतात म्हणजेच ही प्रक्रिया वेदनारहित असते, रक्तस्रावाचे प्रमाण कमीत कमी असते आणि रुग्ण चटकन बरा होतो. या तंत्रामुळे रुग्णाच्या रोगप्रतिकार शक्तीवर कमीत कमी प्रभाव होतो, ओपन सर्जरीच्या तुलनेत ही बाब नक्कीच खूपच फायदेशीर आहे. या प्रक्रियेमध्ये शस्त्रक्रियेनंतर संसर्ग होण्याची आणि गुंतागुंत होण्याची शक्यता देखील तुलनेने कमी असते. इन्ट्युबेशन, चेस्ट ड्रेनेज व युरिनरी कॅथेटरायझेशन यांच्याशी संबंधित समस्या देखील ट्यूबलेस व्हीएटीएसमुळे टाळता येऊ शकतात.”
२०१६ साली बांग्लादेशातील मोहम्मद इफ्तेखार रेहमान या २३ वर्षांच्या व्यक्तीच्या डाव्या मांडीमध्ये ऑस्टिओसरकोमा (हाडाचा कर्करोग) झाल्याचे निदान करण्यात आले. केमोथेरपी आणि त्यानंतर लिम्ब साल्वेज सर्जरी करून ट्युमर काढून टाकून या रुग्णावर २०१६ मध्ये बांग्लादेशात उपचार करण्यात आले. गेल्या वर्षी या व्यक्तीला कोविड-१९ ची बाधा झाली आणि त्याच्यावर बांग्लादेशात उपचार करण्यात आले; त्यावेळी डाव्या फुफ्फुसात खालच्या बाजूला जवळपास १०X८ सेमी आकाराचा ट्युमर असल्याचे आढळून आले. कोविड संसर्गामुळे बांग्लादेशात शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते आणि रुग्णाला केमोथेरपी देण्यात आली. केमोथेरपीची अनेक सेशन्स होऊन देखील ट्युमरचा आकार स्थिर राहिला. जानेवारी २०२१ मध्ये या रुग्णाला अपोलो कॅन्सर सेंटरमध्ये आणण्यात आले. डॉक्टरांच्या असे लक्षात आले की कर्करोग त्याच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये पसरला होता (उजव्या फुफ्फुसात खालच्या बाजूला, डाव्या फुफ्फुसात वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला दोन) त्यामुळे बायलॅटरल लंग मेटास्टेसिस झाला होता.
अपोलो कॅन्सर सेंटरचे कन्सल्टन्ट थोरॅसिस ऑन्कोलॉजिस्ट डॉ. खादर हुसेन यांनी सांगितले, “त्याच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये मेटास्टेसिस होते हे एक मोठे आव्हान होते. रुग्ण आणि त्याच्या कुटुंबियांसोबत तपशीलवार चर्चा केल्यानंतर आम्ही बायलॅटरल व्हीएटीएस मेटॅस्टॅटेक्टॉमी केली यामध्ये लंग लोबेक्टॉमीच्या डाव्या खालच्या लोबचा समावेश करण्यात आला. सर्जरी झाल्यानंतर दोन दिवसात रुग्णाला बरे वाटू लागले व त्याला स्थिर अवस्थेत घरी पाठवण्यात आले.”
अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या उपाध्यक्ष श्रीमती प्रीता रेड्डी यांनी सांगितले, “जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार एकट्या २०२० मध्ये १३ लाखांहून जास्त केसेस नोंदवल्या गेल्या आणि ८.५ लाख जणांना आपले प्राण गमवावे लागले. भारतात कर्करोगाविरोधातील लढाईत अपोलो हॉस्पिटल्स नेहमीच आघाडीवर आहे, त्यासाठी आम्ही नवनवीन तंत्रज्ञान आणि उपक्रमांचा समावेश करत असतो, जेणेकरून देशातील कर्करोगाने आजारी व्यक्तींसाठी उपचार व देखभाल यामध्ये सुधारणा व्हावी. कोविड काळात विविध आवश्यक उपाययोजना व प्रतिबंध यांची अंमलबजावणी करून कॅन्सर रुग्णांसाठी हॉस्पिटल परिसर जास्तीत जास्त सुरक्षित ठेवण्यासाठी अपोलो कॅन्सर सेंटर्समध्ये सर्वतोपरी उपाय केले जात आहेत.”
फुफ्फुसांच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये ट्यूबलेस व्हीएटीएस प्रक्रिया क्रांतिकारी आहे कारण यामुळे बरीच जास्त गुंतागुंत असलेल्या रुग्णाला देखील तातडीने बरे वाटते आणि ही प्रक्रिया काही रुग्णांच्या बाबतीत एका दिवसाच्या सर्जरीसारखी देखील करता येते.ends
Be the first to comment on "२३ वर्षीय बांग्लादेशीय युवकावर अपोलोत केली ‘व्हीएटीएस’ सर्जरी, बांग्लादेशीय मोहम्मद नाहिद हसन यांना डाव्या मांडीच्या हाडामध्ये इविंग्स सरकोमा झाल्याचे निदान करण्यात आले होते"