मुंबई, ९ फेब्रुवारी २०२१ (GNI): जे. कृष्णमूर्तीनी, सहा दशकांपूर्वीच व्यक्ती आणि समाज यांच्या दृष्टीने धोक्याची परिस्थिती कशी निर्माण होणार आहे ह्या गोष्टीची समाजाला जाणीव करून दिली आणि त्याबरोबरच, ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल हे सुद्धा सूचित केलं.
इतिहास ही खरं तर मानवाने स्वतःवर ओढवून घेतलेल्या संकटांची गाथा आहे, आणि ही संकटं नियमितपणे, न चुकता येतच राहतात; तरीही प्रत्येक वेळी सारं जग भांबावून जातं, चकित होतं; तज्ञांची, पंडितांची सगळी गणितं, सगळे आडाखे, तर्कशास्त्र अशा कोणत्याही गोष्टीचा मेळ बसत नाही आणि मग माणसं गोंधळून जातात – असहाय होतात.
सध्या सर्व जगात महामारीमुळे गोंधळाची परिस्थिती आहे. ह्या गोष्टीचा आर्थिक क्षेत्रावर झालेला तीव्र परिणाम आणि त्यामुळे निर्माण झालेला असंतोष यामुळे आपल्याला आणखी एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे… पण यासाठी आपण कोणता मार्ग शोधला आहे? नेहमीप्रमाणे एखाद्या बाहेरच्या गोष्टीचा! मग ते एखादं औषध-लस असो वा आर्थिक स्तरावर परिस्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न असोत… आणि परिस्थिती जरा सुधारली – ‘नेहमीसारखी’ झाली की आपण काय करणार आहोत? आपलं नेहमीचं काम – पोटाची खळगी भरणं आणि पुढे सरकणं! जणू काही ह्या दोन गोष्टी ज्या असाधारण संकटांतून आपण बाहेर पडत आहोत त्याहून भिन्न आहेत. पण आपण आज ज्या पद्धतीने जगत आहोत त्यामुळेच आपण उद्याच्या जागतिक महासंकटाचा पाया तर रचत नाही ना असा प्रश्न आपण स्वतःला कधीच विचारत नाही – आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संघर्षांशिवाय, संकटांशिवाय आपल्याला जगणं शक्य आहे का हा प्रश्न मुळी आपल्याला पडतच नाही.
जे. कृष्णमूर्ती हे विसाव्या शतकाचे ‘धर्म’-धर्मशीलता ह्या गोष्टींचा अतिशय सूक्ष्म दृष्टीने अभ्यास करणारे प्रभावी चिंतक होते. त्यांच्या लेखनातून आणि भाषणांमधून, त्यांनी मानवी मनाचा किती बारकाईने अभ्यास केला होता ह्याची जाणीव होते. आज जगात जी विपरीत स्थिती निर्माण झाली आहे त्याला माणसाचं मनच कारणीभूत आहे हे कृष्णजी सातत्याने सांगत राहिले. साध्या-सोप्या इंग्रजी भाषेतल्या त्यांच्या प्रवचनांमधून, ते मानवी जीवनातील प्रश्नांचा आणि घडामोडींचा वेध घेत असत. त्यांची भाषणं, लेखन, श्रोत्यांबरोबर त्यांनी साधलेला संवाद ह्या साऱ्या गोष्टींमधून, त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा अतिशय स्वतंत्र, आव्हानात्मक दृष्टिकोन दिसून येतो, आपलं नेहमीचं जीवन जगताना अनेक वेळा आपल्याला कसोटीच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. अशा वेळी, आपण काय करायचं – कोणता मार्ग निवडायचा हे ठरवता येत नाही… अशा वेळी, कृष्णजी ज्या पद्धतीने मानवी जीवनाचा विचार करतात त्यामुळे आपल्याला अनेक मूलभूत प्रश्नांची जाणीव होते; ह्यापैकी काही प्रश्नांचा अंतर्भाव ‘द रिअल क्रायसिस (खरंखुरं संकट) – डिजिटल बुकलेट’ ह्या पुस्तिकेत करण्यात आला आहे. १९३४ ते १९८५ ह्या प्रदीर्घ कालखंडात कृष्णजींनी दिलेली व्याख्यान आणि त्यांचं अन्य लेखन ह्या संग्रहात ग्रथित करण्यात आलं आहे.
कृष्णजी एक प्रश्न बऱ्याच वेळा विचारतात: हजारो वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात असलेला मानव इतका दुःखी का आहे – कोणत्या संघर्षात सापडला आहे? प्रचंड प्रमाणात वाढणारी लोकसंख्या, नीतीतत्वांचा अभाव आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे हळूहळू कमी होत चाललेला प्रत्यक्ष संवाद ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर ह्या दुःखाचं मूलभूत कारण काय असेल? – आपला हा देश पुरातन कालापासून विवेकवादी आहे, जिथे अहिंसेला, दयाळूपणाला महत्व दिलं जातं असा हा देश आहे. हिंसेचा निषेध करणारा हा देश आज असा का बनला आहे – असं का झालं, कधी घडलं? आपण आज पूर्णपणे चुकीच्या मार्गाने पुढे का जात आहोत?, a press release said.
‘द रिअल क्रायसिस’ (खरंखुरं संकट) – डिजिटल बुकलेट : १० भारतीय भाषांमध्ये उपलब्ध – हिंदी, तामिळ, मराठी, गुजराथी, मल्याळम्, कानडा, तेलगू, बंगाली, ओडिया आणि इंग्रजी आवृत्ती ww.kfionline.org येथे मोफत उपलब्ध आहे.ends
Be the first to comment on "‘द रिअल क्रायसिस’ (खरंखुरं संकट) मानवाने स्वतःवर ओढवून घेतलेल्या संकटांची गाथा, जे. कृष्णमूर्ती महामारी, आर्थिक मंदी, सामाजिक असंतोष, पर्यावरणाचा र्हास, अपयशी प्रशासन, इतिहास आणि मानवी मनाचे अभ्यासक"