उत्तर मुंबई मतदार संघातील पीयूष गोयल यांचा उमेदवारी अर्ज दाखल, जल्लोषात समर्थन देत भाजप – महायुती कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
मुंबई , 30th April 2024 (GNI) : बोरीवली (पूर्व) येथील प्रसिद्ध श्री पुष्टीपती गणेशाचे सपत्नीक दर्शन घेऊन उत्तर मुंबई लोकसभा मतदासंघांतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी मंगळवारी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार गोपाळ शेट्टी आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष ॲड. आ. आशिष शेलार असे दिग्गज नेते उपस्थित होते.
गेला महिनाभर आपल्या मतदारसंघात झंझावाती प्रचार करणाऱ्या पीयूष गोयल यांनी पत्नी सीमा यांच्यासह नॅन्सी कॉलनी येथील श्री पुष्टिपती गणेश मंदिरात जाऊन गणपती बाप्पा दर्शन घेतले. यावेळी गोयल दांपत्याने स्थानिक भूमीपुत्र असलेल्या कोळी समाजाची लाल टोपी परीधान केली होती. त्यामुळे उपस्थितांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा आणि महायुतीतील बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार, मनसे आणि रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया अशा सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती.
तेथून पीयूष गोयल हजारो कार्यकर्त्यांसह वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या निवडणूक कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोयल यांना समर्थन देत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत खासदार गोपाळ शेट्टी, उत्तर मुंबईचे निवडणूक प्रमुख आ.योगेश सागर उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांत राज्यात महायुतीने केलेले काम आणि दहा वर्षांत केंद्रात भाजपा सरकारने केलेल्या कामाची पोचपावती मतदार यावेळी मतदानातून देतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत. देशाची सुरू असलेली विकासयात्रा यापुढेही सुरू राहिल, असे सांगून पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबईची आपण उत्तम मुंबई करणार असून पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात विकासकामे करणार असल्याचे सांगितले. Ends GNI
Be the first to comment on "उत्तर मुंबई मतदार संघातील पीयूष गोयल यांचा उमेदवारी अर्ज दाखल, जल्लोषात समर्थन देत भाजप – महायुती कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन"