भारतात पहिल्यांदाच करण्यात आलेल्या पॉट्स शंट सर्जिकल प्रोसिजरमुळे ३६ वर्षांच्या महिलेच्या केसमध्ये हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण टाळण्यात मदत झाली

MUMBAI, 07th November 2022 (GNI): Patient Shikha Girdharwal with husband & Dr Prashant Bobhate, Consultant, Children’s Heart Centre, Kokilaben Dhirubhai Ambani, Mumbai – photo by GNI

~ या रुग्ण महिलेला इडिओपॅथिक पल्मनरी अर्टेरियल हायपरटेन्शनचा त्रास होता, हा एक दुर्मिळ आजार असून, यामध्ये मृत्यू दर खूप जास्त आहे, हृदय बंद पडल्याने अचानक मृत्यू ओढवण्याची शक्यता यामध्ये असते.
~ मिनीमली इन्व्हेसिव्ह तंत्र अर्थात शरीरावर कमीत कमी चिरा देऊन पॉट्स शंट प्रोसिजर भारतात पहिल्यांदा करण्यात आली.

मुंबई, 7 नोव्हेंबर 2022 (GNI): कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईने मिनीमली इन्व्हेसिव्ह तंत्र अर्थात शरीरावर कमीत कमी चिरा दिल्या जातील अशा पद्धतीने भारतातील पहिली पॉट्स शंट सर्जिकल प्रोसिजर करून आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. इडिओपॅथिक पल्मनरी अर्टेरियल हायपरटेन्शन (आयपीएएच) या फुफ्फुसाच्या दुर्मिळ विकाराने त्रस्त असलेल्या, ३६ वर्षांच्या श्रीमती शिखा गिरधरवाल यांच्यावर ही नाविन्यपूर्ण, अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यात आली. फुफ्फुसांच्या धमन्यांमध्ये उच्च रक्तदाबामुळे आयपीएएच हा विकार उद्भवतो. सर्वसामान्यतः पॉट्स शंट ही प्रोसिजर ओपन कन्व्हेन्शनल सर्जरीमार्फत केली जाते, यामध्ये अधिक जास्त जोखीम असते आणि रुग्णाची तब्येत पूर्ववत होण्यास देखील खूप जास्त वेळ लागतो. मिनीमली इन्व्हेसिव्ह अर्थात शरीरावर कमीत कमी चिरा देऊन ट्रान्सकॅथेटर पद्धतीमध्ये मांडीतील मुख्य रक्तवाहिनी फेमोरल धमनीचा वापर केला जातो. चिल्ड्रेन्स हार्ट सेंटरचे कन्सल्टन्ट डॉ. प्रशांत बोभाटे यांच्या नेतृत्वाखालील एका विशेष टीमने ही अत्याधुनिक सर्जिकल प्रोसिजर केली.

इडिओपॅथिक पल्मनरी आर्टेरी हायपरटेन्शन (आयपीएएच) हा दुर्मिळ, प्राणघातक आणि वाढत जाणारा आजार आहे जो फुफ्फुसे व हृदयावर प्रभाव निर्माण करतो. फुफ्फुसातील धमन्यांमध्ये खूप जास्त दाब निर्माण झाल्याने हळूहळू हृदयाची उजवी बाजू निकामी होत जाते व अचानक मृत्यू ओढवण्याचा धोका असतो. काही रुग्णांचे शरीर औषधांना योग्य प्रतिसाद देत नाही त्यामुळे औषधांचा उपयोग करण्यास देखील मर्यादा असतात. अशा रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासते. या केसेसमध्ये दोन्ही फुफ्फुसांचे (बायलॅटरल लंग) किंवा हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण हा एकमेव उपचार पर्याय उरतो. हा पर्याय यशस्वी होण्याचा दर खूप कमी आहे, यासाठी खर्च देखील खूप जास्त येतो. अवयव वेळेवर उपलब्ध झाले तरच हे प्रत्यारोपण करता येऊ शकते आणि हे यामधले सर्वात मोठे आव्हान आहे.

३६ वर्षीय श्रीमती शिखा आयपीएएचसाठी सतत औषधे घेत होत्या पण तरी त्यांना फुफ्फुसांमध्ये दाब वाढल्याचे जाणवत होते, लक्षणे अधिकाधिक तीव्र होत होती. वारंवार शुद्ध हरपणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे यामुळे त्या खूप थकल्या होत्या. साधे दहा मीटर अंतर चालणे देखील त्यांना शक्य होत नव्हते. तपशीलवार तपासणीनंतर अत्याधुनिक पॉट्स शंट प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रक्रियेमध्ये फुफ्फुसातील व हृदयावरील दाब कमी करण्यासाठी स्टंट टाकावा आणि फुफ्फुसातील धमनी (फुफ्फुसातील डावी धमनी) आणि शरीरातील मुख्य धमनी (उतरणारी महाधमनी) यांच्यामध्ये रक्तप्रवाहाचा थेट मार्ग तयार केला जातो.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईमधील चिल्ड्रेन्स हार्ट सेंटरचे कन्सल्टन्ट डॉ. प्रशांत बोभाटे यांनी सांगितले, “कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल हे इडिओपॅथिक पल्मनरी आर्टेरी हायपरटेन्शनवर यशस्वी उपचार करण्यासाठी पॉट्स शंटचा उपयोग करणारे भारतातील पहिले रुग्णालय ठरले आहे ही आम्हा सर्वांसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. पॉट्स शंट हे खूप जास्त धोकादायक तंत्र आहे, सर्जरी खूप काळजीपूर्वक करावी लागते. डाव्या फुफ्फुसातील धमनी आणि उतरणारी महाधमनी यांच्यामध्ये बसवण्यात येणाऱ्या स्टेंटची लांबी ठरवण्यात जराजरी चूक झाली तरी रक्तस्त्राव होऊन प्रक्रिया अयशस्वी होऊ शकते. ही प्रक्रिया एखाद्या केसमध्ये केली जाऊ शकते अथवा नाही हे ठरवणे खूप महत्त्वाचे आहे. शंट ज्या रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण करावयाचा आहे त्यांची तपासणी करण्यासाठी संगणकीकृत टोमोग्राफी अँजिओग्राफीसह प्रक्रिया-पूर्व नियोजन केले जाते. ही प्रक्रिया करण्यासाठी कार्डियाक ऍनेस्थेसिओलॉजीमध्ये नैपुण्य असणे देखील खूप महत्त्वाचे असते. पॉट्स शंट निर्माण करण्यासाठी मिनीमली इन्व्हेसिव्ह तंत्राचा वापर करण्याच्या पहिल्या केसमध्ये मिळालेले यश कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये केल्या जाणाऱ्या देखभालीची गुणवत्ता दर्शवते. या रुग्णाच्या तब्येतीमध्ये खूप चांगली सुधारणा झाली असून त्या त्यांचे सर्वसामान्य आयुष्य सुरु करण्यात सक्षम आहेत.”

श्रीमती शिखा यांचे पती श्री. अमित गिरधरवाल यांनी सांगितले, “कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि संपूर्ण टीमने या सर्व उपचारांमध्ये भरपूर सहकार्य केले, त्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत. शस्त्रक्रियेनंतर माझ्या पत्नीच्या तब्येतीमध्ये इतक्या पटकन सुधारणा झाली हे पाहून मला खूप आनंद आणि समाधान वाटले. शिखाच्या उपचारांमध्ये डॉक्टरांनी अतिशय निष्ठेने काम केले व तिची खूप चांगली काळजी घेतली, ही बाब नक्कीच उल्लेखनीय आहे. ती आता चालू शकते आहे आणि भविष्यात तब्येतीमध्ये अजून जास्त सुधारणा होत राहील अशी आशा आहे.”ends GNI SG

Be the first to comment on "भारतात पहिल्यांदाच करण्यात आलेल्या पॉट्स शंट सर्जिकल प्रोसिजरमुळे ३६ वर्षांच्या महिलेच्या केसमध्ये हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण टाळण्यात मदत झाली"

Leave a comment

Your email address will not be published.


*