नवी मुंबई, १० ऑगस्ट २०२२ (GNI):- राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमाअंतर्गत व युनिसेफ या बाळांसाठी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेतर्फे दरवर्षी 1 ते 7 ऑगस्टदरम्यान आरोग्य विभागामार्फत महिलांसाठी स्तनपान जनजागृती सप्ताह राबविण्यात येतो. जागतिक स्तनपान दिवस प्रसंगी अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनेकोलॉजी (प्रसूती आणि स्त्रीरोग) विभाग, तसेच पेडियाट्रिक्स (बालरोग) आणि नियोनॅटोलॉजी विभाग यांनी मिळून माहितीपर तसेच इतर गतिविधींपैकी महिलांसाठी प्रश्नोत्तरीचा कार्यक्रम आणि रांगोळी स्पर्धा आयोजित केली.
डॉ. बिंदु, गायनेकोलॉजी ऑब्स्टेट्रिक्स-सल्लागार, प्रसूती-स्त्रीरोग, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई स्तनपानाच्या महत्त्वाबद्दल सांगताना म्हणाल्या, “नवजात शिशूसाठी आईचे दूध हे पोषक तत्त्वांचे सर्वात महत्त्वाचे स्रोत आहे. स्तनपानाच्या फायद्यांचा प्रचार झाला पाहिजे एवढेच नाही, तर योग्य लॅक्टेशनसाठी मदत आणि संसाधने देखील उपलब्ध करून दिली पाहिजेत. जन्मणा-या बाळाच्या वाढीसाठी मातेचं दूध अत्यंत गरजेचे असते. दुधात सानुल्या बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची अन्नद्रव्ये समाविष्ट असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, बाळ जन्मल्यानंतर पाहिल्या एक तासापासून ते सहा महिन्यांचे होईपर्यंत आईच्या स्तनपानावर वाढले पाहिजे. आईच्या दुधात असे गुण आहेत की ज्यामुळे बाळ हुशार, निरोगी आणि कणखर राहते. शिवाय आईचे दूध स्थूलपणा, डायबेटिस, दमा, पोटासह कानाचे इन्फेक्शन, सडन इन्फन्ट डेथ या सर्वांना प्रतिबंधक आहे.”
जागतिक स्तरावर स्तनपानाचा दर 40% आहे आणि अर्भकांमध्ये आजार भीतीदायक गतीने वाढत आहेत. त्यामुळे, आपल्या समाजामध्ये स्तनपानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे फार महत्त्वाचे आहे. म्हणूनच अपोलोमध्ये आम्ही नवीन पालकांना त्यांच्या बाळाला स्तनपान करण्याबद्दल माहिती देतो आणि त्यांना लागेल तशी मदत सुद्धा करतो. स्तनपान हा निसर्गाचा एक मार्ग असून, ती एक प्रकारची ठेव आहे. त्यासाठी माता-पित्यांना योग्य शिक्षण मिळायला हवे, जेणेकरून ते बालकांना त्यांचा हक्क बहाल करू शकतील. अर्थात, मातेचे आरोग्य या कामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असते. माता निरोगी तर बाळ सुदृढ, हे साधे समीकरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हा सप्ताह लोकजागृतीसाठी १९९० पासून सुरू केला होता. ‘दी र्वल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग अॅक्शन’ ही संस्था १९९१ पासून या सप्ताहासंबंधी विविध घोषणा जाहीर करून १२० देशांमध्ये जनजागृती करीत आहे.
महिलांनी स्तनपानासाठी तयारी कशी करावी, स्तनपानाची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे, तसेच स्तनपानाशी संबंधित दंतकथा आणि अफवा यांच्याबद्दल ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनेकोलॉजी गायनेकोलॉजी (प्रसूती आणि स्त्रीरोग) विभागातील सल्लागार डॉ. बिंदु, डॉ. ओमप्रकाश जामदार, डॉ. श्रीकांत तिवारी, डॉ. मानसी जानी यांनी मार्गदर्शन केले. नर्सिंग स्टाफमध्ये स्तनपानाबद्दल माहिती वाढवण्यासाठी एक मजेशीर प्रश्नोत्तरीचा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला.ends GNI SG
Be the first to comment on "स्तनपान जन-जागृती सप्ताह, आईच्या दुधामुळे बाळ हुशार-निरोगी जागतिक स्तरावर स्तनपानाचा दर 40% आहे आणि नवजात शिशूंमध्ये आजार वाढत आहेत"