मुंबई, ६ जुलै २०२२ (GNI): महाराष्ट्राची भक्ती परंपरा असलेली आषाढवारी तब्बल २ वर्षांनी नव्या जोमाने आणि उत्साहाने विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. आपल्या लाडक्या विठुरायाचे सावळे रूप डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांचे डोळे आसुसले आहेत. या वारीचे औचित्य साधून शेमारू मराठीबाणा वाहिनी एक आगळा उपक्रम राबवत आहे. व्हर्च्युअल रिऍलिटी अर्थात आभासी वास्तव या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून थेट पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन ‘याची देहा, याची डोळा’ भाविकांना घडवणार आहे
अनेक विठ्ठलभक्तांना काही अपरिहार्य कारणांमुळे, अडचणींमुळे इच्छा असूनही वारीत सहभागी होता येत नाही. अशा सर्व भाविकांसाठी शेमारू मराठीबाणा या चित्रपट वाहिनीतर्फे विठ्ठल दर्शनाची अनोखी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्हर्चुअल रिऍलिटी अर्थात आभासी वास्तव या तंत्रज्ञानाचा वापर करून विठ्ठलभक्तांसाठी आपल्या लाडक्या पंढरपूरच्या विठूमाऊलीचे दर्शन घेता येणार आहे. विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरातील गाभाऱ्याचा आभास निर्माण केला जाणार आहे. त्यामुळे थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यासारखी अनुभूती भाविकांना घेता येईल.
हा प्रयोग करणारी शेमारू मराठीबाणा ही पहिलीच मराठी चित्रपट वाहिनी आहे. ५ जुलै ते ८ जुलै या कालावधीत वारीच्या मार्गावर असलेल्या विविध गावांमध्ये ही विठ्ठल दर्शनाची सोय उपलब्ध असणार आहे. तर ९ जुलै ते ११ जुलै या कालावधीत विठूरायाच्या पंढरीतच ही दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
शेमारू मराठीबाणा वाहिनीच्या या अभिनव संकल्पनेमुळे महाराष्ट्रातील लाखो भाविकांना आभासी वास्तवातून विठ्ठल दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. याचा फायदा हा प्रामुख्याने आजारी भाविक किंवा वृद्ध नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात लाखोंच्या संख्येने जनसागर लोटतो. पण त्यातल्या अनेकांना विठूरायाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. त्यांनाही या तंत्रज्ञानाचा वापर करून विठ्ठल दर्शन घेता येणार आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरांचा पुरस्कार करत शेमारू मराठीबाणा वाहिनी सातत्याने आपल्या प्रेक्षकांसाठी अभिनव उपक्रम राबवत आली आहे. यंदाची वारी देखील प्रेक्षकांसाठी अधिक खास करण्यासाठी वाहिनी प्रयत्नशील आहे. या अनोख्या वारीत सहभागी होण्यासाठी, वारी कधी कोणत्या गावी असणारे हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा शेमारू मराठीबाणा वाहिनी. तसेच या उपक्रमाची अधिक माहिती वाहिनीच्या सोशल मीडिया वर देखील उपलब्ध होणार आहे.ends GNI SG
Be the first to comment on "आभासी वास्तव तंत्रज्ञानाने घेता येणार पंढरपूरच्या विठूमाऊलीचे दर्शन"