मुंबई, ११ मार्च २०२२ (GNI): ‘बाहुबली: द बिगिनिंग’ प्रदर्शित झाला आणि ‘बाहुबली द कन्क्ल्युजन’ येईपर्यंत थोरामोठ्यांच्या ओठांवर एकच प्रश्न होता ‘कटप्पा ने बाहुबली को क्यु मारा?’ शेमारु मराठीबाणा चित्रपट वाहिनीने हा अभूतपूर्व अनुभव मराठी भाषेत प्रदर्शित केला आणि मराठी प्रेक्षक “कटप्पा नं बाहुबली ला मारलं,पण का?” असं विचारू लागले. याचं उत्तर घेऊन शेमारु मराठीबाणा येत आहे रविवारी १३ मार्च ला दुपारी १२.०० वा. आणि रात्री ९.०० वा.
डॉ.अमोल कोल्हे, सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, मेघना एरंडे, संस्कृती बालगुडे, उदय सबनीस यांनी आपल्या आवाजांनी बाहुबली मधल्या गाजलेल्या व्यक्तिरेखा मराठी भाषेत पुनरुज्जीवित केल्या आहेत. बाहुबली मराठी ची प्रवीण तरडे यांनी क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून जबादारी पार पाडली आहे. तर लिखाण स्नेहल तरडे यांनी केले आहे.
दिवाळीचं औचित्य साधून शेमारू मराठीबाणा चित्रपट वाहिनीने बाहुबली या महाचित्रपटाचा पहिला भाग मराठी भाषेमध्ये प्रदर्शित केला आणि मराठी भाषिक प्रेक्षकांच्या डोळ्यांसह कानांनाही एक अविस्मरणीय अनुभव दिला कारण बाहुबलीच्या भव्यदिव्य चित्रांना,पात्रांना लाभलेले आवाज मात्र अगदी ओळखीचे होते. एक अजरामर कलाकृती आपल्याला अत्यंत जवळच्या वाटणाऱ्या कलाकारांच्या आवाजात आपल्या भाषेत अनुभवता आल्याने प्रेक्षकांनी या सिनेमाला भरभरून दाद दिली आणि त्यामुळेच ते दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. प्रेक्षकांच्या पसंतीला कौल देत ‘शेमारु मराठीबाणा’ ’बाहुबली: द कन्क्ल्युजन’ रविवारी १३ मार्च रोजी घेऊन येत आहे.
मुळातच यशस्वी ठरलेलं बाहुबली मराठी चित्रपटाचं संगीत, त्यातल्या एकेका भावनेला, शब्दाला न्याय देत मराठमोळं करण्याचं अवघड काम कौशल इनामदार यांनी लीलया पार पाडलं आहे. वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे या गीतकारांची त्यांना सोबत मिळाली आहे. अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, बेला शेंडे, यांसारख्या दिग्गज गायकांनी ही गाणी स्वरबद्ध केली आहेत. केवळ शब्दशः गाणी नाही तर समग्र अनुभव मराठी भाषेत सादर करण्याचा यशस्वी प्रयोग या टीम ने केला आहे. या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे चित्रपट केवळ अनुवादित न वाटता अस्सल मराठी मातीतला भासतो. ‘कटप्पा ने बाहुबली ला का मारलं बुवा!?’ असा प्रश्न आपल्या मायबोलीत अभिमानाने विचारणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत, येत्या रविवारी दुपारी १२.०० वा. आणि रात्री ९.०० वा शेमारू मराठीबाणा चित्रपट वाहिनी ‘बाहुबली द कन्क्ल्युजन’ मराठी भाषेत घेऊन येत आहे.ends
Be the first to comment on "‘बाहुबली द कन्क्ल्युजन’ आता पहा मराठीत ! ‘बाहुबली २’ ची भव्यता अनुभवा शेमारू मराठीबाणा वर"