स्ट्रोकच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका – डॉ. विशाल चाफळे

नवी मुंबई, ३० ऑक्टोबर २०२१ (GNI):- ऑक्टोबर २९ हा जागतिक पक्षाघात (स्ट्रोक) दिन म्हणून पाळला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला न्यूरॉलॉजी कन्सल्टन्ट डॉ. विशाल चाफळे यांनी संवाद साधला स्ट्रोक ही अवघे आयुष्य बदलवून टाकणारी घटना असते. भारतात दरवर्षी दर १ लाख लोकांपैकी १०५ ते १५२ जणांना स्ट्रोक होतो, देशात होणाऱ्या एकूण मृत्यूंच्या कारणांपैकी स्ट्रोक हे चौथ्या क्रमांकाचे कारण आहे तर अपंगत्वाला कारणीभूत ठरणाऱ्या आजारांच्या यादीत याचा क्रमांक पाचवा आहे. स्ट्रोक येणार आहे याची चिन्हे आधीच ओळखून आणि तातडीने लक्ष दिल्यास व उपचार केल्यास रुग्णांवरील परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येते. स्ट्रोक कोणाही व्यक्तीला, कोणत्याही वयात होऊ शकतो पण त्यामध्ये बहुतांश प्रमाण वयस्क व्यक्तींचे असते. स्ट्रोकची चिन्हे आधीच ओळखून त्यांना वैद्यकीय आणीबाणी असे मानून, त्यावर योग्य वैद्यकीय उपचार केले गेल्यास, खास करून स्पेशलाइज्ड स्ट्रोक युनिटमार्फत उपचार केले गेल्यास रुग्णावर होणाऱ्या परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होते. पण बऱ्याच केसेसमध्ये स्ट्रोक होत आहे हे देखील लक्षात येत नाही.

डॉ. विशाल चाफळे, कन्सल्टन्ट – न्यूरॉलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली, ”स्ट्रोकमध्ये मेंदूच्या एखाद्या भागाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो. याची दोन कारणे असू शकतात – रक्तवाहिनी फुटते (हेमोरेजिक स्ट्रोक) किंवा रक्तवाहिनीमध्ये गुठळी होऊन ती ब्लॉक होते (इशेमिक स्ट्रोक). यामुळे मेंदूला होणारा प्राणवायू व पोषकद्रव्यांचा पुरवठा थांबतो व परिणामी मेंदूतील पेशींचे नुकसान होते किंवा त्या मृत होतात. इशेमिक स्ट्रोकचे प्रमाण सर्वाधिक आहे (जवळपास ८५%) स्ट्रोकमुळे होणारे परिणाम हे मेंदूला दुखापत कोणत्या भागात झाली आहे आणि तिचे गांभीर्य किती आहे यावर अवलंबून असतात. स्ट्रोक झाल्यावर प्रत्येक क्षण मोलाचा असतो कारण मेंदूला होणारा रक्तपुरवठा जितका जास्त काळ स्थगित राहील तितके जास्त नुकसान होते.  उपचार लवकरात लवकर सुरु केले गेल्यास स्ट्रोकमुळे होणाऱ्या मृत्यूंचे व त्यामुळे विकृती उद्भवण्याचे प्रमाण कमी होण्यात मदत होऊ शकते आणि रुग्ण आजारातून सुखरूपपणे बाहेर येण्याची शक्यता वाढते व जीव वाचवले जातात.”

डॉ. विशाल चाफळे सांगतात, स्ट्रोक मेंदूच्या कोणत्या भागाला प्रभावित करत आहे त्यावर त्याची लक्षणे अवलंबून असतात. चेहरा, हात किंवा पाय बऱ्याचदा एका बाजूने सुन्न होणे किंवा कमजोर पडणे हे स्ट्रोकचे एक सर्वसामान्य लक्षण आहे. त्याबरोबरीनेच गोंधळ होणे, बोलताना अडखळणे किंवा अचानक बोलू न शकणे किंवा बोललेले समजू न येणे ही देखील लक्षणे दिसून येतात. एका किंवा दोन्ही डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. चालताना अचानक त्रास होऊ लागतो, भोवळ येते, तोल जातो किंवा शरीराच्या अवयवांमधील समन्वय बिघडतो. समजून येण्याजोगे कारण नसताना अचानक खूप प्रमाणात डोकेदुखी किंवा अचानक प्रचंड थकवा येणे ही देखील स्ट्रोकची लक्षणे असू शकतात. एखाद्या सामान्य व्यक्तीला स्ट्रोकची चिन्हे सहज समजून घेण्यासाठी, त्याबाबत जागरूक राहण्यासाठी “द अमेरिकन स्ट्रोक असोसिएशन” ने सुचवलेले ‘फास्ट’ हे संक्षिप्त रूप उपयोगी ठरू शकते. ‘फास्ट’ म्हणजे (एफ-ए-एस-टी) अर्थात एफ – म्हणजे चेहरा, ए आर्म म्हणजे हात, एस स्पीच म्हणजे बोलणे आणि टी टाइम म्हणजे वेळ यांच्याकडे जर लक्ष दिले तर वैद्यकीय ज्ञान नसलेल्या व्यक्तीला देखील स्ट्रोकची लक्षणे अगदी चटकन लक्षात येऊ शकतील आणि त्यामुळे रुग्ण व्यक्तीला तातडीने उपचार दिले जाऊ शकतील.ends

Be the first to comment on "स्ट्रोकच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका – डॉ. विशाल चाफळे"

Leave a comment

Your email address will not be published.


*