Mumbai, 13th February 2021 (GNI): उद्याचा व्हॅलेंटाइन्स डे नेहमीपेक्षा खूप आगळावेगळा ठरणार आहे. फॅन्सी गाला डिनर डेटला जाण्याऐवजी जोडपी आपापल्या प्रिय व्यक्तीसाठी खास पदार्थ बनवतील, यंदाची डिनर डेटची सजावट प्रिय व्यक्तीच्या छोट्या-छोट्या आवडीनिवडी लक्षात घेऊन केलेली, अगदी व्यक्तिगत स्वरूपाची असेल. सगळ्यात जास्त मजा म्हणजे व्हॅलेंटाइन्स डे रविवारी येतोय, नवा आठवडा सुरु करण्यासाठी अगदी योग्य दिवस. तर मग या खास दिवशी खास व्यक्तीसाठी काय खास करता येईल असा विचार जर तुम्ही करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मनोरंजनाचे काही रोमँटिक प्रस्ताव. हे आहेत ५ खास सिनेमे जे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत पाहू शकता आणि पहिल्या कोवळ्या प्रेमाची मजा पुन्हा लुटू शकता.
१. शेमारू मराठीबाणावर पहा ‘गर्लफ्रेंड’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर. लावण्यवती सई ताम्हणकर आणि प्रेक्षकांचा लाडका अमेय वाघ या नव्याकोऱ्या जोडीच्या अभिनयाने सजलेली ‘गर्लफ्रेंड’ ही गोष्ट आहे नचिकेतची, असा तरुण जो प्रेमाच्या बाबतीत कमनशिबी ठरलाय. घरातल्या लोकांना वाटणारी चिंता, इतरांकडून मारले जाणारे टोमणे हे सर्व सहन करावे लागणारा नचिकेत जेव्हा त्याचा मित्र एंगेज होतो तेव्हा मात्र हैराण होतो आणि एक भन्नाट निर्णय घेतो. नचिकेत स्वतःची काल्पनिक गर्लफ्रेंड तयार करतो. गोष्टीला कलाटणी तेव्हा मिळते जेव्हा नचिकेतची काल्पनिक गर्लफ्रेंड प्रत्यक्षात त्याच्या जीवनात प्रवेश करते. पुढे या सिनेमात अनेक गमतीजमती होतात, त्यांची मजा घ्यायची असेल तर १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता शेमारू मराठीबाणावर नक्की पहा ‘गर्लफ्रेंड’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर.
ट्रेलर: https://www.youtube.com/watch?v=EB6Py6mnJ7k
२. आनंदी गोपाळ झी५ वर – परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या जीवनावर बेतलेला हा चित्रपट आहे. आनंदीबाई व गोपाळराव यांच्या सहजीवनाचे हृदयाला भिडणारे दर्शन घडवणाऱ्या या चित्रपटात आपल्या पत्नीला प्रोत्साहन देऊन इतर मुली व महिलांसाठी आदर्शवत बनवणारा पती दिसतो. हा चित्रपट झी ५ वर दाखवला जाणार आहे.
ट्रेलर: https://www.youtube.com/watch?v=mAS_hUTOJdY
३. मुरांबा नेटफ्लिक्सवर
अष्टपैलू व्यक्तिमत्व, गुणी अभिनेत्री मिथिला पालकर आणि आपल्या सहज अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारा अमेय वाघ यांची जोडी म्हणजे तरुणपिढीसाठी भलताच आकर्षणाचा विषय आहे. त्यांचा मुरांबा सिनेमा आधुनिक काळातील नातेसंबंधांचे वास्तव दर्शवतो. तरुणपिढी आणि त्यांचे पालक यांच्यातील तुलना अतिशय आकर्षक पद्धतीने यामध्ये मांडली गेली आहे. तब्बल तीन वर्षे एकत्र असलेले आलोक आणि इंदू आपले नाते संपवतात तेव्हा आलोकच्या आईबाबांना आश्चर्य तर वाटतेच पण ते निराश होतात. सध्याच्या काळातील नातेसंबंधांचे हे असे वास्तव नुसते पाहत बसणे त्यांना शक्य होत नाही आणि ते आलोक व त्याच्या गर्लफ्रेंडला पुन्हा एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरु करतात, अर्थातच नव्या पिढीचा याला विरोध असतो. प्रेम आणि नात्यांमधील एकनिष्ठपणा यामध्ये शेवटी कोणची सरशी होते हे नेटफ्लिक्सवर मुरांबा सिनेमामध्ये पाहणे खूपच मनोरंजक ठरेल.
ट्रेलर: https://www.youtube.com/watch?v=yTvVyt8IIjU
४. डबल सीट झी५ वर
अमितच्या भूमिकेत अंकुश चौधरी आणि मंजिरीच्या भूमिकेत मुक्ता बर्वे यांची डबलसीट ही रोमँटिक आणि तितकीच प्रेरणादायी गोष्ट प्रेम व उत्कट आवड यांचे विविध पैलू दर्शवते. प्रेमामध्ये एखाद्या व्यक्तीला आमूलाग्र बदलवण्याची ताकद असते आणि तेच या फिल्ममधे दाखवले गेले आहे. छोट्या शहरात वाढलेल्या मंजिरीला अमित लग्न करून मुंबईत आणतो तेव्हा ती या शहराचे रंगढंग पाहून विस्मयचकित होते व तिच्या मनात अनेक स्वप्ने फुलू लागतात. मुंबईतील लहानसे घर त्यांना खाजगी आयुष्य जगू देत नाही. नवऱ्याच्या मदतीने एक अपार्टमेंट खरेदी करायचे मंजिरी ठरवते. त्यांचे हे स्वप्न आणि त्याच्या मार्गात येणारे अनेक अडथळे या सिनेमात आपण पाहतो. नाजूक लग्नगाठ एखाद्याला मोठे स्वप्न पाहण्याची, खंबीरपणे अडचणींवर मात करण्याची ताकद कशी देते याची ही गोष्ट अतिशय सुंदर पद्धतीने पेश केली आहे.
ट्रेलर: https://www.youtube.com/watch?v=4oW6W8DH4Xw
५. सोनी लीव वर बकेट लिस्ट
बकेट लिस्ट या चित्रपटाची खासियत म्हणजे सुपरस्टार माधुरी दीक्षितचे मराठी सिनेसृष्टीमधे पदार्पण आणि खरोखरीच हा सिनेमा तिच्या पदार्पणाला साजेसा असाच आहे. रोजच्या कामांच्या धावपळीत स्वतःला आणि स्वतःवर प्रेम करायला विसरून गेलेल्या एका गृहिणीची ही गोष्ट आहे. चतुरस्त्र अभिनेत्री असलेल्या माधुरीने ही भूमिका देखील अतिशय उत्तम वठवली आहे यात काहीच नवल नाही. गृहिणी ते बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी जोमाने प्रयत्न करणारी स्त्री हा तिचा प्रवास डोळ्यांना आणि मनाला सुखावणारा ठरतो. या प्रवासात ती स्वतःवर प्रेम करायला शिकते आणि जीवनात स्वतःला प्राथमिकता देणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला देखील शिकवते. सोनीलीववर हा सिनेमा पाहताना तुमच्या मनात अनेक भावभावना उचंबळून येतील, कदाचित तुम्हालाही तुमची स्वतःची बकेट लिस्ट सापडेल!
Be the first to comment on "‘व्हॅलेंटाइन्स डे’ ला तुमच्या प्रिय व्यक्ती सोबत पहा हे ५ मराठी हिट रोमँटिक सिनेमे"