वजन फक्त ९०० ग्रॅम हृदयदोष असणाऱ्या बाळाला मिळाले जीवनदान बाळाला नव-जीवन देण्यासाठी वैद्यकीय विज्ञान, आईचे प्रेम आणि कोकिलाबेन हॉस्पिटल एकत्र आले

मुंबई, २६ मे २०२२ (GNI): एका आईने तिचे १२ वर्षाचे मूल एका अपघातात गमावले होते आणि अनेक वर्षांनी ती ५० वर्षांची असताना पुन्हा गरोदर राहिल्याने दुःखाच्या छायेत आनंदाचा किरण पसरला होता. पण वेळेआधी प्रसूती झाली आणि बाळ गणेशचे जन्माच्या वेळचे वजन केवळ ९०० ग्रॅम होते.जोडीला जन्मजात हृदयात दोष असल्यामुळे पालकांच्या आनंदाला धोका निर्माण झाला. परंतु जन्मानंतर अवघ्या २० तासांत वेळेवर प्रगत हृदयोपचार करण्यात आले आणि बाळ केवळ ६७ दिवसांचे असताना एक जटिल ओपन हार्ट सर्जरी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल (कोकिलाबेन हॉस्पिटल) येथील डॉक्टरांच्या तज्ज्ञ पथकाने करून बाळाला नवजीवन दिले. वेळेआधी प्रसूती झालेल्या या बाळाचे वजन फक्त ९०० ग्रॅम होते. डॉक्टरांनी सुधारात्मक शस्त्रक्रियेची योजना आखली आणि बाळाचे वजन थोडेतरी वाढेपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला. तथापि जन्मानंतर अवघ्या २० तासांत ऑक्सिजनच्या पातळीत गंभीर घट झाल्याने बाळाची प्रकृती झपाट्याने खालावली. त्यामुळे ह्रदयाचे दोष तात्पुरते व्यवस्थापित करण्यासाठी कमीतकमी तीव्रतेची बलून सेप्टोस्टॉमी ही आपत्कालीन उपचार प्रक्रिया केली गेली.

गर्भामध्ये हृदय दोष असण्याची शंका आल्यामुळे गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीतच आईला कोकिलाबेन रुग्णालयात पाठवण्यात आले होते. गर्भाच्या इकोकार्डियोग्राफीमध्ये असे दिसून आले की विकसीत होत असलेल्या गर्भामध्ये ट्रान्सपोझिशन ऑफ द ग्रेट आर्टरीज (टीजीए) आहे. हा एक प्रकारचा सायनोटिक (रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होणे) हृदय दोष आहे. यामध्ये हृदयातून रक्त फुफ्फुसात आणि शरीरात वाहून नेणाऱ्या दोन मुख्य धमन्या म्हणजेच मुख्य फुफ्फुसीय धमनी आणि महाधमनी या योग्यरित्या जोडलेल्या नसतात किंवा त्यांच्या जागा हललेल्या असतात.

डॉ सुरेश राव, चिल्ड्रन हार्ट सेंटरचे संचालक आणि सल्लागार बालरोगतज्ञ आणि जन्मजात हृदय विकार शल्यचिकित्सक, कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल म्हणाले, “या केस मध्ये या जोडप्याने आधीच त्यांचे एक मूल एका अपघातात गमावले होते आणि ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे जोडपे असल्याने हे बाळ त्यांना मूल होण्याची एकमेव संधी होती. संपूर्ण गरोदरपणात आईची तब्बेत आणि गर्भाची स्थिती यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत होते. पण २९ व्या आठवड्यात आईच्या प्रकृतीत झालेल्या गुंतागुंतीमुळे आम्हाला बाळाची मुदतपूर्व प्रसूती करावी लागली. बाळाची फुफ्फुसे विकसित न झाल्याने त्याला तात्काळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.”

डॉ. सुरेश राव म्हणाले, “दोन महिन्यांपेक्षा जास्त वयाचे बाळ गंभीर आजारी पडले आणि त्यावर तात्काळ शस्त्रक्रियेची गरज होती. बाळाचे वजन फक्त दीड किलो असूनही बाळाचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला पुढे जावे लागले. आम्ही आर्टेरिअल स्विच शस्त्रक्रिया केली. कमी वजनामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीची होती. या बाळाचे कमी वजन आणि वय हे एक खूप मोठे आव्हान होते आणि त्याच्या वेळेपूर्व प्रसूतीतून झालेल्या संसर्गामुळे या गुंतागुंतीत आणखी भर पडली होती. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया सामान्यतः जेव्हा बाळांचे वजन किमान २ किलो असते तेव्हा केल्या जातात. कोकिलाबेन हॉस्पिटलच्या एनआयसीयूमध्ये ८६ दिवस निरिक्षणाखाली राहिल्यावर आणि बाळाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधार पडल्यावर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आम्हाला आनंद आहे की सर्व आव्हाने असतानाही, शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आम्ही बाळाला आयुष्यात दुसरी संधी देऊ शकलो. एकाच छताखाली पूर्णवेळ पाठबळ आणि आपत्कालीन सेवा पुरविणाऱ्या विविध तज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेमुळेच हे शक्य झाले आहे.”

बाळाच्या आईने कृतज्ञता व्यक्त केली, “कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने आमच्या मौल्यवान नवजात बाळाला वाचवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. ही आमच्यासाठी कसोटीची वेळ होती आणि सातत्यपूर्ण पाठबळ आणि काळजीसाठी डॉक्टर आणि कोकिलाबेन रुग्णालयातील संपूर्ण टीमचे आम्ही आभारी आहोत. गुंतागुंतीचे निदान करण्यापासून ते उपचार करण्यापर्यंत नेहमी माझे बाळ सुरक्षित राहील हे त्यांनी सुनिश्चित केले. माझ्या बाळाची काळजी घेण्यासाठी ते २४*७ उपलब्ध असल्यामुळेच मला आणि माझ्या पतीला पुन्हा एकदा पालकत्व अनुभवण्याची संधी मिळत आहे!”ends GNI SG

Be the first to comment on "वजन फक्त ९०० ग्रॅम हृदयदोष असणाऱ्या बाळाला मिळाले जीवनदान बाळाला नव-जीवन देण्यासाठी वैद्यकीय विज्ञान, आईचे प्रेम आणि कोकिलाबेन हॉस्पिटल एकत्र आले"

Leave a comment

Your email address will not be published.


*