‘बॉम्ब डिस्पोजल स्क्वाड’ मधील पोलिसाला अपोलोने दिले जीवनदान, ४२ वर्षीय आशीर्वाद लाडगे जिलेटीन बॉम्ब न्यूट्रलाइज करताना स्फोटात गंभीर जखमी झाले होते

नवी मुंबई, १९ मे २०२२ (GNI): रायगड जिल्हा पोलीसच्या बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वाडमधील कर्मचारी श्री.आशीर्वाद लाडगे (वय वर्षे ४२) महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड येथे पोलीस परिसरात एक जिलेटीन बॉम्ब न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झाले होते. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे ईआरमध्ये जेव्हा श्री.आशीर्वाद यांना आणण्यात आले तेव्हा ते बेशुद्धावस्थेत होते. त्यांच्या अंतर्गत आणि बाह्य महत्त्वाच्या अवयवांना अनेक गंभीर दुखापती झालेल्या होत्या. त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये भरती करून घेण्यात आले.स्फोटाची तीव्रता खूप जास्त असल्याने त्यांना अनेक जखमा झालेल्या होत्या, चेहरा, डोळे आणि पोटामध्ये अनेक अनेक छोटे-मोठे कण रुतलेले होते. डाव्या डोळ्यामध्ये एक मोठा पत्र्याचा तुकडा घुसल्यामुळे मोतीबिंदू व डोळ्यातील पडदा फाटला होता. उजवी बरगडी तुटली होती. आतडे आणि यकृत यासारख्या संवेदनशील अंतर्गत अवयवांमध्ये जखमा झाल्या होत्या. उजव्या कानातही त्रास होऊ लागला होता आणि पोटाच्या बाजूला अनेक जखमा होत्या.

अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमधील तज्ञ कन्सल्टन्ट्सची टीम एकत्र आली आणि शरीराचे नुकसान नियंत्रणात आणण्याची तातडीची योजना ठरवली गेली, त्यापाठोपाठ रुग्णाला सर्वसामान्य जीवन पुन्हा मिळवून देण्यासाठी सुस्पष्ट उपचार योजना आखली गेली. रुग्णाला खाता आले पाहिजे, खाल्लेले पचले पाहिजे, दृष्टी, श्रवण क्षमता सुधारली पाहिजे आणि उजव्या हाताचे अपंगत्व कमीत कमी केले जावे या बाबींचा यामध्ये समावेश होता. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे जनरल सर्जन डॉ शालीन दुबे यांनी सांगितले, “आतड्यांना झालेल्या जखमा बऱ्या करण्यात आल्या असून आता रुग्ण नेहमीचे जेवण जेवू शकत आहे आणि पचन देखील सर्वसामान्यपणे होत आहे.”

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णाची ९०% दृष्टी परत आली आहे पण स्फोटमुळे झालेला गंभीर आघात आणि जखमा यातून पूर्णपणे बरे होण्यासाठी शस्त्रक्रियांनंतर निश्चित उपचार योजना अंमलात आणली जाणे आवश्यक आहे. वैद्यकीयदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त होऊन नोकरीत पुन्हा रुजू होण्यासाठी रुग्णाला जवळपास एक वर्ष लागेल असा अंदाज आहे. डॉ महेश उपरकर, कन्सल्टन्ट नेत्रतज्ञ,अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले, “दृष्टी ठीक होण्यासाठी डाव्या डोळ्यावर दोन टप्प्यांमध्ये शस्त्रक्रियेची योजना करण्यात आली होती. पत्र्याच्या तुकड्याबरोबर मोतीबिंदू देखील काढला आणि डोळ्याचा फाटलेला पडदा पहिल्या टप्प्यामध्ये नीट केला गेला. जखमा आणि स्फोट यांचा परिणाम होऊन अंतर्गत ऑक्युलर दुखापतीमुळे दोन्ही डोळ्यांमध्ये ग्लुकोमाचा धोका निर्माण झाला असून नीट काळजी घेऊन आणि आय ड्रॉप्सचा वापराने ग्लुकोमा वाढणे थांबवले जाऊ शकते. त्यानंतर डोळ्यामध्ये एक इंट्राऑक्युलर लेन्स चिटकवली गेली ज्यामुळे डोळा जवळपास पूर्णपणे बरा झाला आहे.”

श्री. संतोष मराठे, रिजनल-सीईओ, अपोलो रुग्णालय, नवी मुंबई म्हणाले, “आपल्या पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा आणि तत्परता याबद्दल त्यांचे कौतुक आहे. बॉम्ब स्फोटामध्ये झालेल्या जखमा खूप गुंतागुंतीच्या स्वरूपाच्या असल्याने त्यांच्यावर उपचार करणे हे एक खूप मोठे आव्हान असते. रुग्ण यशस्वीपणे बरा व्हावा आणि त्यांची तब्येत दीर्घकाळपर्यंत चांगली राहावी यासाठी डॉक्टरांची मल्टी-स्पेशालिटी टीम अथक प्रयत्न करत आहे.  रुग्ण लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी त्यांच्या संपूर्ण तब्येतीवर डॉक्टरांची टीम सतत लक्ष ठेवून आहे.”ends GNI SG

Be the first to comment on "‘बॉम्ब डिस्पोजल स्क्वाड’ मधील पोलिसाला अपोलोने दिले जीवनदान, ४२ वर्षीय आशीर्वाद लाडगे जिलेटीन बॉम्ब न्यूट्रलाइज करताना स्फोटात गंभीर जखमी झाले होते"

Leave a comment

Your email address will not be published.


*