नवी मुंबई, ४ ऑगस्ट २०२१ (GNI): गुजरात, वलसाड मधील ७ वर्षांची मुलगी सौम्या तिवारीच्या मानेमध्ये तंतुमय ट्युमर असल्याने तिची मान ९० अंशात कललेली होती, सलग दोन शस्त्रक्रिया करून देखील हा ट्युमर काढता आला नव्हता आणि त्यामुळे मुलीची मान वाकडीच राहिली होती. मान कलती करणारा आणि मान फिरवण्यात अडथळा आणणारा हा ट्युमर ‘टॉर्टिकॉलीस’ म्हणून ओळखला जातो, याला मानेचा तिरपेपणा देखील म्हणतात. पण या मुलीच्या बाबतीत स्नायू कॅल्सिफाय (पेशीजालात कॅल्शियम साठणे) झालेले होते आणि कॉलर हाड व कवटीचे हाड हे एका अस्थिमय पट्टीने एकत्र जुळले होते, त्यामुळे तिचे डोके तिच्या शरीराला अशा पद्धतीने जोडले गेले होते की तिला डोक्याची काहीच हालचाल करता येत नव्हती. कोणत्याही ऑर्थोपेडिक/मेडिकल जर्नल/लिटरेचरमध्ये अशा गुंतागुंतीच्या केसचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता आणि अशा प्रकारच्या केसमध्ये अनेक टप्प्यांचा समावेश असलेली शस्त्रक्रिया केली जाण्याची ही पहिलीच वेळ होती.
अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे स्पेशलाइज्ड मल्टी-डिसिप्लिनरी टीमने या ७ वर्षाच्या मुलीवर अतिशय गुंतागुंतीची, अनेक टप्प्यांचा समावेश असलेली शस्त्रक्रिया केली. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे येण्याआधी साडेपाच वर्षे ही मुलगी हा त्रास सहन करत होती. आपल्या मुलीमधील हा विकार दूर होऊन तिला सर्वसामान्य जीवन जगता यावे यासाठी शेवटची आशा म्हणून तिचे कुटुंबीय तिला अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये घेऊन आले. स्पाईन सर्जरी व पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक विभागातील डॉक्टरांच्या टीमने त्या मुलीची तपासणी केली. अनेक टप्प्यांचा समावेश असलेली तपशीलवार उपचार योजना आखली गेली पण त्यासाठी नाक, कान, घसा तज्ञ, बालरोगतज्ञ, प्लास्टिक सर्जरी डिपार्टमेंट यांची गरज लागणारी होती. या मुलीचे डोके संपूर्ण तिरपे झालेले होते आणि त्याची कसलीही हालचाल होत नव्हती. एमआरआय/सीटी स्कॅन इमेजिंगमध्ये एक अस्थिमय पट्टी दिसून आली जी गळपट्टीच्या हाडापासून कानामागील हाडापर्यंत आलेली होती. तपशीलवार विचारविनिमय व सल्लामसलतीनंतर अतिशय गुंतागुंतीची अनेक टप्प्यांचा समावेश असलेली सर्जरी करण्याची योजना केली गेली.
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे स्पाईन सर्जन डॉ. अग्निवेश टिकू यांनी सांगितले, “ही मुलगी जेव्हा सहा महिन्यांची होती तेव्हा तिच्या मानेच्या उजव्या बाजूला एक गुठळी तयार झाल्याचे आढळून आले होते, ही गुठळी हळूहळू वाढत गेली आणि त्यामुळे मान तिरपी झाली. मुलगी ९ महिन्यांची असताना तिच्यावर पहिली सर्जरी झाली. ‘फायब्रोमॅटोसिस कॉली’ म्हणून ओळखली जाणारी स्टर्नोक्लेडोमैस्टॉइड स्नायूचे सौम्य फायब्रोबस्टिक प्रॉलिफिरेशन अशी ही स्थिती असल्याचे आढळून आले. ही एक जन्मजात फायब्रोटिक प्रक्रिया आहे खूपच दुर्मिळ आहे आणि फक्त ०.४% नवजात बाळांना हा त्रास होतो. सर्वसामान्यतः हा त्रास एका बाजूला होतो, तीन चतुर्थांश केसेसमध्ये उजव्या बाजूला होतो आणि मुलींपेक्षा मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते.”
या केसमध्ये मुलगी १५ महिन्यांची असताना तिच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, पण त्यावेळी ती पडली आणि पुढील उपचार घेऊ शकली नाही, तिच्या मानेतील विकाराने अधिक गंभीर स्वरूप धारण केले. डॉ. टिकू म्हणाले की, “मानेचा तिरपेपणा आणि मान अजिबात फिरवता न येणे हे इतक्या वाईट स्थितीत होते की मानेच्या मणक्याचे पहिले व दुसरे अशी दोन हाडे त्यांच्या मूळ जागेवरून सरकलेली होती.”
मुलीचे वडील श्री. निलेश तिवारी यांनी सांगितले, “मुलीला इतका त्रास होत होता, ते पाहणे देखील आम्हा सर्वांसाठी खूप वेदनादायक होते. आम्ही भारतात खूप ठिकाणी गेलो पण केसमध्ये खूप जास्त धोका होता त्यामुळे कोणीही शस्त्रक्रिया करायला तयार नव्हते. माझ्या एका मित्राने अपोलो हॉस्पिटल्समधील स्पेशलिस्ट्सना भेटण्याबाबत सुचवले. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमधील डॉक्टरांनी आम्हाला ही केस तपशीलवारपणे समजावून सांगितली आणि त्यांनी मुलीवर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया केल्या. आज आमची मुलगी स्वतःचे डोके सरळ ठेवू शकते आणि आता ती इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे झाली आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे.”
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे सीओओ आणि युनिट हेड श्री. संतोष मराठे यांनी सांगितले, “आज या मुलीचा विकार लक्षणीय प्रमाणात दूर झाला आहे. मानेतील व्यंग दूर होऊन ती सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी सक्षम झाली आहे, आता तिला कोणताही अडथळा न येता मान हलवता येते. आम्ही या मुलीवर यशस्वीपणे उपचार करू शकलो, तिला अपोलो हॉस्पिटल्समध्ये आणताना तिच्या कुटुंबियांच्या मनात ज्या आशा व अपेक्षा होत्या त्या आम्ही पूर्ण करू शकलो याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. सर्वोत्तम क्लिनिकल परिणाम प्रदान करण्यासाठी आणि आरोग्यसेवा व रुग्णांना मिळणारे अनुभव यामध्ये नवे मापदंड निर्माण करण्यासाठी आमच्या निपुण वैद्यकीय तज्ञांना अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध करवून देण्यासाठी या अशाच केसेस आम्हाला सातत्याने प्रेरणा देतात.” Ends
Be the first to comment on "सात वर्षीय ‘सौम्या’ वर अपोलोत गुंतागुंतीची क्षस्त्रक्रिया यशस्वी ९० अंशात जन्मताच झुकलेली मान केली सरळ"