हृदय रुग्णांसाठी ‘मिट्राक्लिप’ प्रक्रिया जीवनदान ठरते, एकाच दिवशी चार मिट्राक्लिप प्रक्रिया करणारे अपोलो आशियातील पहिले रुग्णालय

नवी मुंबई, १७ मार्च २०२१ (ZGNI):– अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप या आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक विश्वसनीय आरोग्यसेवा समूहाने आणखी एक विक्रमी टप्पा पार करत एकाच दिवशी एकामागोमाग एक अशा चार मिट्राक्लिप प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. हृदय बंद पडल्यामुळे अतिशय गंभीर स्थितीत असलेल्या चार रुग्णांवर अपोलो हॉस्पिटल्समध्ये एकाच दिवशी मिट्राक्लिप रोपणे करण्यात आली. यापूर्वी जपानमध्ये एकाच दिवशी तीन रुग्णांवर मिट्राक्लिप प्रक्रिया करण्यात आल्या होत्या आणि आता अपोलो हॉस्पिटल्सने लक्षणीय कामगिरी बजावत जपानला देखील मागे सारून आघाडी घेतली आहे. अपोलो हॉस्पिटल्सच्या सिनियर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. साई सतीश यांनी एकामागोमाग एक अशा चार मिट्राक्लिप प्रक्रिया केल्या. शरीरावर दिल्या जाणाऱ्या छेद व चीरांचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या पद्धती मिट्राक्लिप थेरपीमध्ये वापरल्या जात असल्याने ओपन हार्ट सर्जरी न करता देखील गळती होत असलेल्या हृदयाच्या झडपांची दुरुस्ती करता येते आणि शस्त्रक्रिया केल्यास ज्यांना खूप जास्त धोका आहे अशा रुग्णांसाठी मिट्राक्लिप प्रक्रिया खूप मोठे जीवनदान ठरते. यानंतर तीन दिवसात हे चारही रुग्ण (यांच्यापैकी सर्वात वयस्कर रुग्ण हे ८७ वर्षांचे आहेत) अगदी व्यवस्थित, चालत घरी गेले आणि त्यांची प्रकृती ठीक आहे.

अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे चेअरमन डॉ. प्रताप सी रेड्डी म्हणाले, “आशिया खंडात प्रथमच अशी कामगिरी करून दाखवत आमचे सर्जन्स महत्त्वाचे टप्पे पार करत आहेत ही अतिशय अभिमानस्पद बाब आहे. हृदयाच्या झडपांमधील गंभीर स्वरूपाच्या गळतीमुळे आजारी असलेल्या आणि प्रतिबंधात्मक सर्जिकल धोका असलेल्या रुग्णांना मिट्राक्लिपच्या साहाय्याने आम्ही जणू दुसरे जीवन मिळवून देऊ शकतो. आजवर ५० पेक्षा जास्त देशांमधील १००००० पेक्षा जास्त रुग्णांवर मिट्राक्लिप प्रक्रियेचा वापर करण्यात आला आहे. हृदय रुग्णांवर मिट्राक्लिप प्रक्रिया करण्यासाठी प्रमाणित करण्यात आलेल्या, भारतातील काही निवडक रुग्णालयांमध्ये अपोलोचा समावेश आहे.” 

मिट्राक्लिप हे क्रांतिकारी डिव्हाईस असून तीन वर्षांपूर्वी आपल्या देशात आणले गेले. हृदयाच्या झडपेमध्ये गळतीची समस्या असलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी शस्त्रक्रिये व्यतिरिक्तचा पर्याय म्हणून याचा वापर करता येतो. हृदयाच्या झडपांमधील गळतीमुळे हृदयाचे कार्य बंद पडण्याचा देखील धोका असतो. मिट्राक्लिप प्रक्रियेमुळे ओपन-हार्ट सर्जरी टाळता येते आणि मांडीतील एका शिरेमध्ये कॅथेटरमार्फत हृदयापर्यंत पोहोचता येते. थ्रीडी इकोकार्डिओग्राफिक आणि फ्लुओरोस्कोपिक मार्गदर्शनानुसार कॅथेटर वापरून मिट्राक्लिप हृदयात पोहोचवली जाते.

अपोलो हॉस्पिटल्समधील सिनियर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. साई सतीश यांनी सांगितले, “गेली जवळपास तीन वर्षे आम्ही मिट्राक्लिप प्रक्रिया करत आहोत. एकाच दिवसभरात चार अतिशय आजारी रुग्णांवर एकामागोमाग एक मिट्राक्लिप रोपणे करण्याचा आत्मविश्वास आम्हाला आमच्या सखोल अनुभवातून मिळाला. खरेतर, आमची मूळ योजना त्यादिवशी फक्त दोन रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची होती पण इतर दोन रुग्णांची तब्येत खूपच बिघडली आणि त्यांच्यावर देखील तातडीने शस्त्रक्रिया करणे भाग पडले. अनुभवी टीमच्या सहकार्यामुळे आम्ही एकामागोमाग एक अशा चार मिट्राक्लिप प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडू शकलो.  या यशामुळे अपोलो हॉस्पिटल्समधील संपूर्ण टीमचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. देशात आतापर्यंत २१ हृदय रुग्णांवर मिट्राक्लिप प्रक्रिया करण्यात आल्या आहेत त्यातील १३ शस्त्रक्रिया अपोलो रुग्णालयात केल्या गेल्या आहेत.”

Be the first to comment on "हृदय रुग्णांसाठी ‘मिट्राक्लिप’ प्रक्रिया जीवनदान ठरते, एकाच दिवशी चार मिट्राक्लिप प्रक्रिया करणारे अपोलो आशियातील पहिले रुग्णालय"

Leave a comment

Your email address will not be published.


*