येत्या प्रजासत्ताक दिनापासून ‘महाराष्ट्र व्यापारी पेठ’ मुंबईकरांच्या भेटीला, २६ जानेवारी ते ७ फेब्रुवारी पर्यंत बोरिवली (प) येथे महाराष्ट्र व्यापारी पेठेचे आयोजन

मुंबई, १५ जानेवारी २०२१ (GNI):- कोरोना आजारामुळे करण्यात आलेल्या प्रदीर्घ लॉकडाऊन नंतर पुनःश्च हरिओम करण्यासाठी मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाकडून आयोजित करण्यात आलेली मुंबईकरांची हक्काची खरेदीची पेठ तुमची आमची हमखास भेट..

येत्या प्रजासत्ताक दिनापासून म्हणजेच २६ जानेवारी २०२१ पासून गेली ३१ वर्षे होतकरू मराठी तरुण-तरुणींना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देणारी व असंख्य मुंबईकर ग्राहकांचे हक्काचे खरेदीचे स्थान असणारी आणि विश्वसनीय ब्रॕण्ड म्हणून सुप्रसिद्ध असणारी महाराष्ट्र व्यापारी पेठ मुंबईकरांच्या भेटीसाठी येत आहे. कोरोना आजारामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊन नंतर पुनःश्च हरी ओम करण्याच्या उद्देशाने मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळातर्फे दिनांक २६ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत महाराष्ट्र व्यापारी पेठेचे मुंबईतील सुप्रसिद्ध भाटिया वाडी हॉल, ५७ टिपीएस रोड, बाभई नाका, बोरिवली पश्चिम येथे आयोजन करण्यात आले आहे.

याविषयी अधिक माहिती सांगताना मंडळाचे कार्यवाह अमित गोडबोले म्हणाले की, होतकरू मराठी तरुण तरुणींना व्यापाराची संधी मिळावी, त्याचबरोबर विक्री कौशल्याचे संपूर्ण प्रशिक्षण मिळावे या उदात्त हेतूने मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाने १९८९ साली मुंबईतील दादर भागात ‘महाराष्ट्र व्यापारी पेठ’ भरविण्याचा धाडसी निर्णय घेतला. तेव्हापासून तब्बल सतत ३१ वर्षे साठ दिवसांची आणि सुमारे १०० गाळेधारक मराठी व्यापाऱ्यांची ही व्यापारी पेठ, दादरच्या रानडे रोडवरील, डॉ. अँटोनिया डिसिल्वा शाळेच्या पटांगणात भरत आली आहे.  महाराष्ट्र व्यापारी पेठेला एक प्रकारे व्यापाराची कार्यशाळाच म्हणता येईल. महाराष्ट्र व्यापारी पेठेने शेकडो मराठी व्यापाऱ्यांना स्वतःची दुकाने सुरु करण्याचा आत्मविश्वास दिला. अनेक गाळेधारकांनी आज स्वतःची दुकाने मुंबई, महाराष्ट्र भागात सुरु केली आहेत. लॉकडाऊन नंतर होणारी पहिलीच पेठ आम्ही बोरिवली पश्चिम येथे भरवीत आहोत. तरी माझे मुंबईतील सर्व व्यावसायिकांना, उद्योजकांना आणि ज्यांना व्यवसायाची सुरुवात करण्याची इच्छा आहे, अशा सर्व जणांना आवाहन आहे. आपणांस जर या पेठेत भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी लवकरात लवकर आमच्या मंडळाशी संपर्क साधावा व आपला गाळा आरक्षित करावा.

मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाबाबत माहिती देताना कार्यवाह अमित गोडबोले म्हणाले की, आज मुंबईत मराठी माणूस कित्येक वर्षांपासून व्यवसाय करत आहे. पण स्वतंत्रपणे व्यवसाय करणाऱ्या मराठी व्यापाऱ्यांचा पूर्वी एकमेकांशी विशेष परिचय किंवा सलोखा नसायचा. त्यामुळे पुढे या सर्वच भागातील मराठी व्यापारी व व्यावसायिकांची संख्या कमी होत गेली. मराठी व्यापाऱ्यांमध्ये असलेला असंघटितपणा हे त्याचे मुख्य कारण होते. दादर विभागातील काही सुजाण मराठी व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी ही परिस्थिती लक्षात घेतली व त्यातूनच त्यांनी १९८० साली दादर भागात मराठी व्यापारी मित्रमंडळाची स्थापना केली आणि मराठी व्यावसायिक व उद्योजकांना आपले हक्काचे व्यासपीठ मिळाले. कालांतराने वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिक आणि व्यापारी  या सर्वांच्या सहभागासाठी या मंडळाचे नंतर ‘मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळ’ असे नामकरण करण्यात आले आहे.

मराठी व्यापारी, व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेणे, त्यांच्यात एकोपा आपलेपणा निर्माण करणे, समस्या सोडविण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, व्यापार वृद्धीसाठी त्यांना सर्व प्रकारे मदत करणे, नवीन व्यवसायांची माहिती देणे व वेगवेगळ्या व्यवसायाप्रमाणे त्यातील तज्ज्ञांना बोलावून मार्गदर्शन करणे, अशी उद्दिष्टे निश्चित करून मंडळाने आपल्या कार्याला प्रारंभ केला. आजमितीला दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे मंडळाच्या शाखा कार्यरत असून मंडळाची एकूण सभासद संख्या ४,१०० हुन अधिक आहे. मंडळाच्या सदस्यांना आर्थिक अडचणींत मदत करण्यासाठी मंडळाकडून १९८३ साली ‘मुंबई व्यापारी सहकारी पतपेढी’ ची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला सभासदांना १० हजार रुपये कर्ज देणारी पतपेढी आज व्यवसाय उद्योगांसाठी सदस्यांना २० लाखांपर्यंत कर्ज देत आहे व आजच्या घडीला पतपेढीचे २००० पेक्षा जास्त मराठी सभासद आहेत.

मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाविषयी व त्यांच्या उपक्रमांविषयी अधिक माहिती देताना मंडळाचे कार्याध्यक्ष मकरंद चुरी म्हणाले की, दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या सोमवारी मंडळाचा वर्धापनदिन साजरा केला जातो. आपल्या कर्तृत्वाने उद्योग क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या मराठी व्यावसायिक, उद्योजक, व्यापाऱ्यांचा या दिवशी सत्कार करण्यात येतो. मंडळाच्या सभासदांसमोर यशस्वी उद्योजकांचा आदर्श निर्माण व्हावा व त्यांच्या अनुभवांचे बोल सभासदांना ऐकावयास मिळावे हाच या सत्कारामागील सकारात्मक उद्देश असतो. त्याचबरोबर मंडळातील सभासदांमध्ये एकोपा वाढावा, एकमेकांच्या परिचयाने आपलेपणा वाढावा यासाठी मंडळातर्फे दरवर्षी वर्षासहलही काढण्यात येते. त्याचप्रमाणे शासकीय कर प्रणालीतील वेळोवेळी होणारे बदल, अर्थसंकल्प, सरकारी योजना, आयात-निर्यात धोरण अशा विविध विषयांवर मंडळातर्फे भाषण, व्याख्याने, चर्चासत्रे व परिसंवादाचे आयोजन करून मंडळाच्या सदस्यांना व्यापार उदिमांबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच मागील काही वर्षांपासून मंडळातर्फे खास महिला उद्योजिकांसाठी एक दिवसीय शिबिराचे आयोजन केले जाते.

याशिवाय मंडळातर्फे उद्योजकांना नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंडळातर्फे परराष्ट्र दौऱ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यामध्ये परदेशातील घडामोडी, व्यापार विषयक घडामोडी याबद्दल आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी चांगले मार्गदर्शन केले आहे. त्याचा अनेकांनी फायदा घेतलेला आहे. तसेच मराठी उद्योजकांना व्यापार क्षेत्रातील बदलत्या प्रवाहाची अद्ययावत माहिती मिळावी, उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुण पिढीला अर्थसहाय्य, उद्योग संधी, संभाव्य अडचणी याचे ज्ञान तज्ञांकडून मिळावे याकरिता मंडळातर्फे २००४ आणि २०१३ साली ‘अखिल भारतीय मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी परिषदे’ चे भव्य  आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून २००० प्रतिनिधी त्या परिषदेसाठी आले होते.

महाराष्ट्र व्यापारी पेठेबाबत अधिक माहितीसाठी मंडळाची वेबसाईट http://www.marathivyapari.com वर visit करा.

Be the first to comment on "येत्या प्रजासत्ताक दिनापासून ‘महाराष्ट्र व्यापारी पेठ’ मुंबईकरांच्या भेटीला, २६ जानेवारी ते ७ फेब्रुवारी पर्यंत बोरिवली (प) येथे महाराष्ट्र व्यापारी पेठेचे आयोजन"

Leave a comment

Your email address will not be published.


*