महापालिकेच्या जकात विभागाची ऐतिहासिक व धडक कारवाई

महापालिकेच्या जकात विभागाची ऐतिहासिक व धडक कारवाई

१३७ कोटी रुपये किमतीचे हिरे, सोने, चांदी जडजवाहिर पकडले

तब्बल ५२ लाखांच्या दंडासह ५७ लाख रूपये महापालिकेच्या तिजोरीत जमा

MUMBAI, (GNI): बाहेरील राज्‍यातून १३७ कोटी रुपये किंमतीचे हिरे, साने, चांदी इत्यादी जडजवाहिर व अन्‍य वस्‍तू जकात चुकवून बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात येत असताना महापालिकेच्या जकात विभागाच्या दक्षता पथकाने धडक कारवाई करुन सदर माल जप्‍त केला आहे. उपलब्ध माहिती नुसार महापालिकेच्या जकात विभागाच्या इतिहासात ही सर्वात मोठी कारवाई आहे. मुंबई सेंट्रल परिसरात करण्यात आलेल्या जप्तीच्या कारवाई नंतर नियमानुसार देय असणारी जकात व दहापट दंड याप्रमाणे एकूण ५७ लाख रुपयांची जकात संबंधितांकडून वसूल करण्यात आलेली आहे. याप्रमाणे रक्कम वसूल झाल्यानंतर जप्त करण्यात आलेला मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आलेला आहे.

ही कारवाई बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनानुसार उप आयुक्‍त(करनिर्धारण व संकलन) डॉ. बी.जी. पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

याबाबत विशेष बाब म्हणजे नियमानुसार हिरे, सोने यासारख्या मौल्यवान धातूंवर अत्यंत नाममात्र म्हणजे ०.०१ टक्के एवढी जकात महापालिकेद्वारे आकारण्यात येते. मात्र अनेकदा ही नाममात्र जकात देखील भरण्याचे संबंधितांद्वारे टाळण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई सेंट्रल परिसरात आज करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान १३७ कोटी रुपयांचा जो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालावर नियमानुसार जकात भरली असती तर संबंधितांना केवळ ५ लाख १८ हजार रुपये महापालिकेकडे जकातीपोटी भरावे लागले असते. मात्र याबाबत टाळाटाळ केल्यामुळे संबंधितांना सुमारे ५२ लाखांच्या दंडासहित ५७ लाख रुपये महापालिकेकडे जमा करावे लागले आहेत. तरी सर्व संबंधितांनी दंड टाळण्यासाठी महापालिकेच्या जकात विभागाकडे नियमानुसार जकात जमा करावी असे आवाहन महापालिकेद्वारे करण्यात आले आहे.

त्यानुसार जकात विभागाच्या पथकाने मुंबई सेंट्रल परिसरात केलेल्या जप्तीच्या कारवाईमध्‍ये तब्बल रुपये १३१ कोटी ७५ लाख एवढ्या किमतीचे हिरे, रुपये ३ कोटी ७६ लाख किमतीचे १२.५४८ किलो सोने व सोन्याचे दागिने, तर रुपये १ कोटी ३७ लाख एवढ्या किमतीचे ३६५ किलो चांदी जप्त करण्यात आले. त्याचबरोबर सुमारे रु. १४ लाख इतक्या किमतीची ९०० किलो ईमिटेशन ज्‍वेलरी व रुपये ८१ हजार एवढ्या किमतीची इतर जकातपात्र सामुग्री जप्त करण्यात आली. याप्रमाणे एकूण रु.१३७ कोटी ०४ लाख ९ हजार ६०३ एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला. सदर जप्‍त मालावरील अनुज्ञेय जकात व त्‍यावर दहापट दंड आकारुन रु. ५७ लाख एवढी जकात वसूल करुन संबंधितांकडे जप्‍त मुद्देमाल स्‍वाधीन करण्‍यात आला.

मुंबई सेन्‍ट्रल परिसरातून सुमारे २६ आयातदार व त्‍यांच्‍या ८० इसमांकडून पिशव्‍यांमध्‍ये सदरचे जडजवाहिर व अन्‍य वस्‍तू आयात करताना दिसल्‍याने महापालिकेच्‍या जकात पथकाने त्‍यांना ताब्‍यात घेऊन भायखळा येथील करनिर्धारण व संकलन खात्‍याच्‍या कार्यालयात घेऊन येऊन सदरच्‍या जप्‍त जडजवाहिरांची पडताळणी करण्‍यात आली व प्रचलित बाजारभावाप्रमाणे त्‍यांची किंमत काढण्‍यात येऊन नियमित जकात आकारण्‍यात आली.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्‍प) डॉ. संजय मुखर्जी यांनी संबंधित उप आयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) डॉ. बी.जी.पवार यांच्या सह संबंधित पथकातील करनिर्धारक व संकलक श्री. संजोग कब्रे, जकात अधिक्षक श्री. जयंत नाईक, पर्यवेक्षीय निरिक्षक श्री. संजय संख्‍ये, श्री. किसन लिये, अशोक बोरसे, .के. गांगुर्डे, विजय बी. काटकर, देविदास उ. गुंडे व संबंधित कर्मचायांचे अभिनंदन केले आहे.ends

Be the first to comment on "महापालिकेच्या जकात विभागाची ऐतिहासिक व धडक कारवाई"

Leave a comment

Your email address will not be published.


*